रणबीर कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी फार मेहनत घेणाऱ्या रणबीरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच अवघ्या काही क्षणांमध्ये मोठ्या संख्येने हे फोटो लाइक करण्यात आले. इतकेच नाही तर अनेकांनी हा फोटो शेअर आणि रिपोस्टही केला. संजूबाबाच्या लूकमधील रणबीरचे हे फोटो प्रेक्षकांची दाद मिळवतात तोच त्याच्या ऑनस्क्रिन मुलांसोबतचा फोटोही सध्या चर्चेत आला आहे.

संजय दत्तच्या मुलांच्या भूमिकेत झळकणाऱ्या या दोन चिमुकल्यांसोबत रणबीरही त्यांचा ‘डॅडी कूल’ झाला आहे असेच म्हणावे लागेल. रणबीर सोबतच या फोटोमध्ये दिसणारी ही दोन लहान मुलं संजय दत्तच्या मुलांची म्हणजेच इकरा आणि शाहरान यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ते संजूबाबाच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आणि त्यातील बारकावे टिपण्यास प्राधान्य देत आहेत हेच फोटो पाहताना लक्षात येते.

दरम्यान, संजय दत्तच्या बायोपिकशी संबंधित फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चित्रपटामध्ये रणबीर सहा विविध रुपांमध्ये दिसणार आहे. तारुण्यावस्थेतील संजय दत्त यापासून ते त्याच्या तुरुंगवासातील दिवसांपर्यंतच्या क्षणांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबतच इतरही बरेच कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे हिरानींचा हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरत आहे. कारण परेश रावल, मनिषा कोईराला, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, सोनम कपूर, जिम सार्भ आणि विकी कौशल यांसारखे तगडे कलाकार या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. परेश रावल आणि मनिषा कोईराला यात संजूबाबाचे आई-वडील म्हणजेच सुनील दत्त आणि नरगिस यांच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत.