संजय दत्त शिक्षा पूर्ण करून काहीच महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला. त्याने आता भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून त्याच्या अभिनय करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संजय लवकरच त्याच्या ‘भूमी’ या सिनेमातून पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणालाही सुरुवात झाली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण आग्रा येथे लवकरच सुरू होणार आहे. तसेच त्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमाचेदेखील काहीच दिवसांपूर्वी चित्रीकरण सुरू झाले आहे. या सिनेमात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारताना दिसणार आहे.

[jwplayer Vpu2EWaG]

आपल्या ‘भूमी’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी त्याने त्याच्या आयुष्यावर बनवल्या जात असलेल्या या सिनेमाच्या सेटवर नुकतीच भेट दिली. संजय दत्तच्या आयुष्यावर बनवण्यात येत असलेल्या सिनेमाचे चित्रीकरण सध्या मढ येथे सुरू आहे. या मढच्या सेटवर नुकतीच संजयने हजेरी लावली होती. अचानक संजय दत्त आलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पण त्या धक्यातही आनंद होताच.

संजय सेटवर येणार असल्याची सेटवर कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळेच सगळ्यांनाच त्याचे हे सरप्राईज फार छान वाटले. सेटवर त्याने सिनेमाचे आतापर्यंत चित्रीत करण्यात आलेली दृश्य संजयने पाहिली आणि त्याला आवडली असल्याचेही त्याने टीमला सांगितले. एवढेच नव्हे तर त्याच्या उपस्थितीत सिनेमातील काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी रणबीर प्रत्येक सीननंतर त्याने केलेला सीन संजयला आवडला की नाही हे अनेकवेळा तो विचारत असल्याचे अनेकांनी पाहिले.

संजय सेटवर आल्यानंतर रणबीर सतत संजयसोबतच होता. संजयने सिनेमाचे निर्माते विधु विनोद चोप्रा, रणबीर यांच्यासोबत दुपारचे जेवणदेखील केले. राजकुमार हिरानी त्यांच्या कामात व्यग्र असल्याने त्यांना संजय दत्तसोबत जास्त वेळ घालवता आला नाही.

[jwplayer 9zAV12MZ]