Sanjay Dutt speaks on India situation in Shekhar Tonight show: अभिनेता संजय दत्तनं आपल्या लोकप्रिय ‘मुन्नाभाई’ या व्यक्तिरेखेच्या शैलीत देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मिश्कील शैलीत भाष्य केलं आहे. अभिनेते शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाइट’ या कार्यक्रमात संजय दत्तनं नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्यानं देशातील सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त करत, “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही,” अशी स्पष्ट खंत व्यक्त केली. तसेच ‘पाच मिनिटांसाठी पंतप्रधान झाल्यास काय कराल?’ या प्रश्नावर त्याने मुन्नाभाईच्या शैलीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर त्यांचे नाव न घेता विनोद केला.
गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी झालेल्या विशेष भागामध्ये संजय दत्तनं महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ देत विनोदी शैलीत मार्मिक टोला लगावला. सार्वजनिक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा होणारा अतिरेक आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टीका करतानाच, ट्रम्प यांनी संघर्षाऐवजी ‘गांधीगिरी’चा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला.
“भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही”
देशातील सध्याच्या वातावरणावर बोलताना संजय दत्त म्हणाला, “आपल्या देशातील नागरिक अत्यंत प्रेमळ आहेत. येथे कायम शांतता असायला हवी, मात्र मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. भारतीय लोक मोठ्या मनाचे आणि आदरातिथ्य करणारे आहेत. आपण जगाला भरभरून दिलं आहे आणि आपण तसेच राहिलं पाहिजे. ते शांततेचे जुने दिवस पुन्हा लवकर परतावेत, अशी मी प्रभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो.”
मुन्नाभाई ‘पंतप्रधान’ झाला तर…
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शेखर सुमन यांनी संजय दत्तला विचारलं की, ‘जर तुला पाच मिनिटांसाठी देशाचे पंतप्रधान केलं, तर देशवासीयांना काय संदेश देशील?’ यानंतर संजय दत्तनं ‘मुन्नाभाई’च्या अंदाजात पंतप्रधान म्हणून एक छोटेखानी भाषण ठोकलं. ज्यात त्याने चालू घडामोडींवर विनोदनिर्मिती केली.
संजय दत्त मुन्नाभाईच्या शैलीत बोलत असताना माईकवर बोटं ठोठावतो त्यातून आवाज येताच म्हणतो, “चला, देशात काहीतरी चालू आहे… माझ्या प्रिय देशवासियांनो, आज तुमचा पंतप्रधान बनल्यानंतर मी खूश आहे. बोले तो बॉडी में अजीब टाइप का तरंग दौड रेला है। एवढा मोठा देश, इतके सारे लोक आणि त्या सर्वांची जबाबदारी माझ्यावर…”
पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर विनोद
पुढे बोलताना संजय दत्तने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवरून टोला लगावला.
आपलं भाषण पुढं नेताना संजय दत्त म्हणाला, “पण तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मी विदेशात जाणार नाही. मी इथेच राहणार, तुमच्या सर्वांबरोबर. नाहीतर पंतप्रधान आणि सामान्य जनतेचा संपर्क कसा राहणार? संजय दत्त पुढे म्हणाला, “मला देशासाठी इतकं काम करायला मिळत आहे तर मी आणखी एक काम करेन. जिथं जिथं माझा फोटो लागलाय ना, तिथून तो कमी करणार. देशाला देशाचा फोटो दिसायला हवा. जिथं माझा फोटो लावायचं मन करेल ना तिथं गांधीजींचा फोटो लावेन. बोले तो गांधीजींचे विचार दिसणे जास्त गरजेचे आहे. माझा फोटो पाहून लोक काय करणार?”
ट्रम्पना गांधीगिरी शिकवणार
यानंतर संजय दत्तने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प मामू संबोधित संजय दत्त म्हणाला, “ट्रम्प मामू जगाची फोटो फ्रेम बिघडवू पाहत आहेत. ट्रम्प मामू थोडं भरकटले आहेत. आपण त्यांना विनम्रतेनं समजवणार. मामू, सर्वांवर हल्ला करून जगाची वाट नाही लावायची. तूम्ही एका देशावर हल्ला करणार तर तुमचं पाहून दुसरा तिसऱ्यावर हल्ला करणार. मग सगळे मिळून बोलणार वर्ल्ड पिस, वर्ल्ड पिस… इतकं सगळं करून शांतता कुठून येणार. शांतता ब्लिंकिंटची ऑर्डर थोडीच आहे का? यासाठी ट्रम्प मामू यांना थोडी गांधीगिरी शिकवावी लागेल.”
“ट्रम्प मामू तुम्ही काय सारखं टॅरिफ टॅरिफ लावलंय. जरा तारीफ करायलाही शिका. तुम्ही तारीफ करायला लागलात की, मानसिक समाधान मिळेल. तर मी अमेरिकेला येतोय. तुम्हीला जादूची झप्पी द्यायला. जय हिंद, जय भारत…”, असं म्हणत संजय दत्तनं काल्पनिक पंतप्रधानांच्या भाषणाचा शेवट केला.
