Marathi Actor On Sanjay Gaikwad Controversy : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेऊन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात मोठे पडसाद उमटत आहेत.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर दाखवताना आमदार संजय गायकवाड यांचा तोल गेल्याचे दिसले. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला, याविषयी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारत शिव्यांची लाखोली वाहिली.
राज्यातून चौफेर टीका झाल्यावर अखेर शुक्रवारी आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, संजय गायकवाडप्रकरणी विविध स्तरांतून राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानेही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. हा अभिनेता म्हणजे श्रेयस राजे.
मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून श्रेयसने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा श्रेयस सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तसेच तो अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवरसुद्धा आपल्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो. अशातच अभिनेत्याने संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळ प्रकरणावर त्याचे मत व्यक्त केले आहे.

“ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट” : श्रेयस राजे
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीवर श्रेयस म्हणतो, “आई-बहिणीवरून अर्वाच्य शब्दांत वाट्टेल तशा शिव्या देणारे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘वंशज’ म्हणवतात आणि हेच महाराष्ट्राच्या विधानभवनात लोकप्रतिनिधी म्हणून बसलेले असतात. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.” यासह त्याने निषेधसुद्धा व्यक्त केला आहे.

तसेच श्रेयसने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचा फोटो शेअर करीत “ही असते लेखणीची ताकद. या पुस्तकाला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार. ज्यांनी वाचलं नसेल; त्यांनी जरूर वाचा” असं म्हटलं आहे.
संजय गायकावड यांचा पुस्तकावरील आक्षेप कायम
दरम्यान, संजय गायकवाड यांनी शिवीगाळप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दलचा आपला आक्षेप कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुस्तकात छत्रपतींचा किमान ५०० वेळा शिवाजी, असा एकेरी उल्लेख असल्याचे ते म्हणाले.
