Sanjay Leela Bhansali attacked : ‘ते इतिहासाचे रखवालदार आहेत का?’

राजपूत करणी सेना किंवा जे कोणी असतील त्यांना असे करण्याचा काय अधिकार आहे?

बॉलिवूडमधील चित्रपटांशी संबंधित सर्वजण भन्साळी यांच्या मागे एकवटले आहेत.

‘पद्मावती’ या आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका राजपूत गटाने आपल्यावर केलेला हल्ला आणि चित्रपटाच्या सेट्सवर घातलेला धुमाकूळ हा प्रकार ‘अनावश्यक’ होता व त्यामुळे या सुंदर शहराच्या प्रतिमेचे अत्यंत नुकसान झाले आहे, असे सांगून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण रद्द केले आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील चित्रपटांशी संबंधित सर्वजण भन्साळी यांच्या मागे एकवटले आहेत.

बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांनीदेखील सदर प्रकरणी त्यांचा राग व्यक्त केला. आयएएनस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले की, सत्य न जाणता, चित्रपट न पाहता तुम्ही मोर्चा काढता आणि मारहाण करण्यास सुरुवात करता. या देशात चित्रपट निर्माता आणि कलाकारांसाठी हीच सुरक्षा आहे का? याचे उत्तर कोणाकडे आहे? उद्या तुम्ही सर्वांसोबत असे करण्यास सुरुवात कराल. अशाप्रकारे चित्रपट बनवणं कठीण होऊन जाईल. कोण आहेत ते लोक? ते इतिहासाचे रखवालदार आहेत का?, असा सवालही ऋषी कपूर यांनी केला. सदर घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत संतापाचे वातावरण आहे. आलिया भट्ट, करण जोहर, फरहान अख्तर यांसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा राग व्यक्त केला. सोशल मिडीयावर व्हारल झालेल्या व्हिडिओत करणी सेनेचे कार्यकर्ते तोडफोड करताना दिसतात. त्याचसोबत ते नारेबाजी करत शिवीगाळ करत असल्याचेही दिसते.

ऋषी कपूर म्हणाले की, जर तुम्हाला काही करायचे असेल तर आधी चित्रपट पाहा आणि नंतर तुमचे मत द्या. मारहाण करून तुम्ही कायदा हातात कसे घेऊ शकता? हे कोण लोक आहेत? राजपूत करणी सेना किंवा जे कोणी असतील त्यांना असे करण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही न्याव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ शकत नाही. आपल्याकडे यासाठी न्यायव्यवस्था आहे. तिलाच बरोबर आणि चूक याचा निर्णय घेऊ देत. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यापूर्वी त्यास पाहतो. त्याप्रमाणे चित्रपटांना कात्रीही लावली जाते. चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करण्यात आल्याचे मी ट्विटरवर वाचले. त्यांच्या या मुर्खपणामुळे कलाकारांना तारखा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता याची नुकसान भरपाई कोण करणार. संजय लीला भन्साळीने सदर कार्यकर्त्यांना न्यायलयात खेचावे असा सल्लाही यावेळी ऋषी कपूर यांनी दिला.

‘आक्षेपार्ह चित्रण नाही’
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याआधी दोन चित्रपटांचे चित्रिकरण जयपूरमध्ये केले आहे. राजस्थानविषयी त्यांना नेहमीच प्रेम आणि ओढ वाटते. चित्रपटात कोणतेही आक्षेपार्ह चित्रण नाही. मात्र असे असूनही शुक्रवारी झालेल्या प्रसंगानंतर चित्रिकरण थांबवून जयपूर सोडण्याचा निर्णय भन्साळींनी घेतला असल्याचे अधिकृत निवेदन शनिवारी देण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay leela bhansali attacked rishi kapoor advises to sue padmavati set destroyers

ताज्या बातम्या