Sanju Rathod Meets Rohit Sharma : संजू राठोड सध्याच्या घडीला म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. यासह तो एक गीतकारसुद्धा आहे. त्यानं आतापर्यंत गायलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. परंतु, तो खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आला ते ‘गुलाबी साडी’ या सुपरहिट गाण्यामुळे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याच्या या गाण्यानं अनेकांचं लक्ष वेधलं.
संजू राठोडचा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. कॉन्सर्ट्सला त्याचे चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतात. अशातच नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील संघाच्या एका कार्यक्रमासाठी संजू राठोड उपस्थित होता. यावेळी त्यानं पुन्हा एकदा त्याच्या गायनानं उपस्थित असलेल्या सर्वांचं मनोरंजन केलं. याचवेळी स्टार क्रिकेटर रोहित शर्माची त्यानं भेट घेतली आणि त्याच्याबरोबरचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. संजू राठोडनं रोहित शर्माशी काय संवाद साधला आणि त्याची फॅन मुमेंट कशी होती याबद्दल जाणून घेऊयात…
संजू राठोडसाठी फॅन मुमेंट
संजू राठोडनं इन्स्टाग्रामवर रोहित शर्माबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून संजू राठोड रोहित शर्माकडे ऑटोग्राफ मागत असल्याचं दिसतं आणि या व्हिडीओला छान अशी कॅप्शनसुद्धा त्यानं दिली आहे. रोहित शर्माला भेटल्यानंतर रोहितनं त्याला मिठी मारली आणि त्याच्याशी हात मिळवला. यावेळी रोहितकडे ऑटोग्राफ मागितल्यानंतर रोहितनं त्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. या व्हिडीओला त्यानं “आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं, धन्यवाद रोहित शर्मा, राजा माणूस” अशी कॅप्शन दिली आहे. एकूणच संजूसाठी ही एक फॅन मुमेंट असल्याचं त्याने यामधून म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाच्या या कार्यक्रमामध्ये संजूनं गाणी गात सर्व खेळाडूंचं मनोरंजन तर केलंच, परंतु यावेळी रोहितबरोबरच त्यानं हार्दिक पंड्याचीही भेट घेतली. हार्दिक व संजूचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. संजू राठोडनं यापूर्वीसुद्धा क्रिकेटपटूंची भेट घेतली असून सामन्यापूर्वी व नंतर त्याच्या गाण्यांनी सर्वांचं मनोरंजन केलं आहे.
दरम्यान, लवकरच आयपीएल २०२६ सुरू होणार आहे, त्यामुळे प्रत्येक संघ व त्यातील खेळाडू तयारी करत आहेत. आपल्याकडे अनेकांना क्रिकेटची आवड असून कलाकार ते सर्वसामान्य माणूस प्रत्येक जण क्रिकेटचे सामने पाहत असतो. अनेकदा मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीसुद्धा या सामन्यांना हजेरी लावतात.
