Sanju Rathod New Song Bangles : ‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’, ‘शेकी’, ‘सुंदरी’ ही संजू राठोडची सगळीच गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरली आहेत. संजूचं नवीन गाणं केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचं ‘सुंदरी’ हे गाणं सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालं होतं. यानंतर संजू नवीन गाण्यावर काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने इनस्टाग्रामवर लाल बांगड्यांचा फोटो शेअर करत चाहत्यांना नव्या गाण्याची हिंट दिली होती. अखेर १९ एप्रिलला त्याचं ‘Bangles’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.
संजूच्या ‘Bangles’ या गाण्याला अवघ्या २४ तासांत जवळपास २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय हे गाणं युट्यूबवर १२ क्रमांकावर ट्रेंड होत आहे. यावरून ‘Bangles’ गाणं सुद्धा सर्वत्र धुमाकूळ घालणार हे स्पष्ट झालं आहे.
“लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल” असे या ‘Bangles’ गाण्याचे बोल आहेत. संजू राठोडने स्वत: हे गाणं लिहिलं असून त्यानेच कंपोझ सुद्धा केलं आहे. यासह या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे.
या Bangles गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना संजू राठोड आणि ईशा मालवीय यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली आहे. ईशा यापूर्वी संजूच्या ‘शेकी’ गाण्यात झळकली होती. या गाण्याने रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळवले होते. याशिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींना देखील ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली होती. भाग्यश्री, माधुरी दीक्षित यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी शेकी गाण्यावर ठेका धरला होता. आता संजू आणि ईशाच्या ‘Bangles’ गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजूच्या या गाण्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “ईशा मालवीय आणि संजू राठोड = ५०० मिलियन ह्यूज”, “नवीन ट्रेंड आता सेट होणार आहे”, “चला आता पुढचे काही दिवस सोशल मीडियावर फक्त लाल बांगडी गाणं ऐकायला मिळेल”, “गुलाबी साडी काळी बिंदी आणि आता लाल बांगडी…संजूकडे सगळ्या रंगांची गाणी आहेत”, “दादा कमाल गाणं बनवलंय”, “आता इन्स्टाग्राम लाल-लाल होऊन जाणार”, “संजू मस्त गाणं” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
