Sanju Rathod ‘Pahije’ New Song Juilee Joglekar : ‘गुलाबी साडी’, ‘शेकी’, ‘नऊवारी साडी’, ‘लाल बांगडी’ अशी एकापेक्षा एक जबरदस्त गाणी लिहिणारा लोकप्रिय गायक संजू राठोडने गणेशोत्सवानिमित्त त्याच्या तमाम चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. संजूचं नवीन गाणं आज ( १६ सप्टेंबर ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या गाण्याबद्दल सर्वांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या गाण्याचा अधिकृत व्हिडीओ युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
संजू राठोडच्या या नव्या गाण्याचं नाव आहे ‘पाहिजे’ ( Pahije ). “सोडूनी आज सारी लाज गं…राणी माझ्यासोबत नाच गं” असे या गाण्याचे बोल आहेत. या म्युझिक व्हिडीओमध्ये संजूसह सौम्या कांबळे झळकली आहे.
‘पाहिजे’ ( Pahije ) गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. याशिवाय संजूसह या गाण्याला ‘सारेगमप’ फेम प्रसिद्ध मराठी गायिका जुईली जोगळेकरने सुद्धा आवाज दिला आहे, जुईली गाण्यात देखील झळकली आहे. यामध्ये तिचा नेहमीपेक्षा वेगळा अन् रॉकिंग लूक पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांनी संजूच्या या नव्या गाण्यावर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
“संजू राठोड नेहमीच भारी गाणी बनवतो”, “वॉव संजू दादा जबरदस्त”, “बॅक टू बॅक हिट्स”, “ट्रेंडिंग गाणं”, “भारी आहे”, “बंजारा Vibes”, “जुईली लय भारी”, “प्रत्येक वेळी वेगळं आणि जबरदस्त गाणं कमाल दादा”, “संजू भाई ऑन टॉप” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, संजूचा जन्म जळगावमधील धनवड गावात झाला. घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती, स्टारडम वगैरे तर अजिबातच माहिती नव्हतं…संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये. संजू हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याला स्टेजवर परफॉर्म करताना सुद्धा प्रचंड भीती वाटायची. पण, त्याच्या मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं आणि याच प्रेमापोटी संजूने आपली आवड जोपासली आणि एवढं मोठं यश मिळवलं. संजूने मराठी संगीत विश्वाला एक वेगळी दिशा दिली आणि आपल्या मातृभाषेतील गाणी जगभरात सुपरहिट करून दाखवली.
