अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक मानला जातो. नाटक, मालिका, चित्रपट माध्यम कोणतही असो संकर्षण नेहमीच त्याच्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. संकर्षणसुद्धा अनेकदा त्याच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अशातच अभिनेत्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात आणि अनेक सुख दुःखाचा प्रसंगांना ते सामोरे जात असतात, यादरम्यान त्यांच्याबरोबर अशी माणसं असतात जी पडद्यावर दिसत नाहीत मात्र पडद्यामागे त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे असतात. ज्यामुळे ते पडद्यावर आपलं मनोरंजन करत असतात. असंच काहीसं संकर्षणचही आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, पण त्याचा हा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नसेल आणि या काळात त्याला ज्या व्यक्तीने कायम मदत केली त्याच्यासाठी संकर्षणने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
कोण आहे संकर्षणचा खास मित्र?
संकर्षणच्या आयुष्यातील ही महत्त्वाची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा अत्यंत जवळचा मित्र अनिकेत सराफ आहे. त्याच्यामुळे अनेकदा संकर्षणला त्याच्या बायकोचे टोमणेसुद्धा ऐकावे लागतात असं त्याने पोस्टमधून सांगितलं आहे. यावरून या दोन मित्रांची मैत्री किती घट्ट असेल याचा अंदाजा येतो. या पोस्टमधून संकर्षणने त्याच्या मित्राचं कौतुक करत आजवर त्यांने प्रत्येक प्रसंगात दिलेल्या पाठिंब्यासाठी त्याचे आभार मानले आहेत. संकर्षण त्याच्या जिवलग मित्राबद्दल नेमकं काय म्हणाला जाणून घेऊया.
मित्रामुळे संकर्षणला ऐकावे लागतात बायकोचे टोमणे
संकर्षणने इंस्टाग्रामवर त्याचा मित्र अनिकेत सराफबरोबर एकाच कप बशीने चहा पितानाचा गोड फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संघर्षण या पोस्टमधून म्हणाला, “अनिकेत सराफ माझा जीव की प्राण. ह्या फोटोत आम्ही दिसतोय तशीच आमची मैत्री आहे. कविता लिहिली की पहिल्यांदा अनिकेत ऐकतो… नाटक लिहिलं की पहिला प्रेक्षक अनिकेत असतो. बायको म्हणते माझ्याशी बोलतांना तुला झोप आलेली असते आणि अनिकेतचा फोन आला की बाहेर गैलरीमध्ये जाऊन तासभर गप्पा मारतोस. आता ह्याच्यावरून तुम्हाला पक्का अंदाज येईल. आमच्या वयात ५ वर्षांचं अंतर आहे, पण आमच्या खोड्या पाचवीतल्या पोरांपेक्षा थिल्लर आहेत. अनिकेतमुळे मला गाण्याची गोडी लागली, त्याच्यासोबत मी पहिल्यांदा मुंबई पाहिली. झी मराठीवरच्या सारेगमपच्या पहिल्या पर्वात होता तेव्हा त्याची लोकप्रियता मी जवळून पाहिलिये तेव्हा त्याचा तानपुरा घेऊन मी त्याच्यासोबत फिरायचो. आता अनिकेत व्यवसाय आणि इतर गोष्टींसाठी छ. संभाजीनगरमध्ये असतो, आता आम्ही एकत्रं असताना मला कुणी ओळखलं तर खुल्या मनाने त्यांना म्हणतो तुमचा मोबाईल द्या मी फोटो काढतो. अशा मित्रांसोबत एक चहा घेतला की पावसाळा सुरू होतो आणि एक वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मिळते”.
संकर्षणच्या पोस्टनुसार अनिकेत सराफ संकर्षणच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींपैकी असून त्याने कायमच त्याच्या मित्राला सुख दुःखाच्या प्रसंगात खंबीरपणे साथ दिल्याचं कळतं. संकर्षण अनेकदा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी अशा पोस्ट करत असतो आणि त्याच्या भावना व्यक्त करत त्याच्या जवळच्या माणसांचे आभार मानतो. त्याचा हा साधा स्वभाव आणि दिलखुलासपणा त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
दरम्यान, संकर्षणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमात काम करण्याचा त्याला अनुभव असून गेल्या काही वर्षांपासून तो रंगभूमीवर सातत्याने सक्रिय असून विविध प्रयोग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
