Sankarshan Karhade New Poem Video : लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक अशा अनेक क्षेत्रात आपली मुशाफिरी करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून संकर्षणकडे पाहिले जाते. अभिनेता असण्याबरोबरच एक कवी म्हणूनही त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्यानं नुकतीच एक नवी कविता शेअर केली आहे.
नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून संकर्षण प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्याच्या कवितांचे कार्यक्रमही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच त्यानं ‘चहा’ वरील नवी कविता प्रेक्षकांसमोर सादर केली. या कवितेचा खास व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे.
संकर्षणची ही कविता अशी आहे की,
परवा एक जण भेटले, म्हणले हे काय बरोबर नाय.
हल्ली कविता इन्स्टाग्रामला टाकली नाही, काय सुचत नाही की काय…
पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो,
कागद-पेन घेऊन एकदम साहित्यिकाच्या भूमिकेत घुसलो…
एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला,
कशावर लिहावी कविता या विचारात बराच वेळ गेला…
राग काढत बायकोला म्हटलं जरा बायकोसारखी वाग,
नवरा कधीपासून लिहितोय कपभर चहा तरी टाक…
ती म्हणाली फाडलेल्या कागदाचे किती बोळे झालेत पाहा,
आणि कवितेच्या नावाखाली सकाळपासून १३ कप झालाय चहा…
बायकोचा हा बाण माझ्या काळजात घुसला,
ताजा-ताजा विषय मला कवितेसाठी सुचला…
म्हणलं आता काय लिहितो, ते तुम्ही फक्त पाहा,
कवितेचा विषय आहे, सर्वांच्या आवडीचा चहा…
चढायचा असेल पर्वत तर कमरेतून वाकावं लागतं
आणि हवा असेल चहा तर आधी तो आपल्याला टाकावा लागतो…
चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत,
उद्योग नसल्यासारखे त्या चहाचे शेकडो प्रकार काढलेत…
आल्याचा, गुळाचा, साखरेचा, गवताचा…
पंढरपूरचा, येवल्याचा, टपरीचा, चुलीवरचा…
बार्बीक्यू, बासुंदी, टिपटिप, इराणी…
मटका, काळा, कम दूध, ज्यादा पाणी…
क्रिकेट या खेळाशीसुद्धा चहाचा संबंध दिसतो,
म्हणून तिथेसुद्धा कॉफी नाही, तर टी-टाइम असतो…
राजकारणातही चहा करतो मनोमिलनाचं काम,
ते करायला विरोधकही करतात चहापान…
चहा पिणाऱ्यांची लागे तंद्री तो पावे अंतर्धान
आणि मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान…
आता इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं?
जवळच्यांना जवळ घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं…
नाही नाही म्हणता म्हणता मला चहावर कविता सुचली हो
तिथून चहाचा पेला घेऊन येणारी बायको मला दिसली हो…
चौदावा चहा देत ती म्हणाली, ‘अजून किती देऊ?’
तिला म्हणालो, ;हाच चहा आपण अर्धा अर्धा पिऊ…’
संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेचा व्हिडीओ
दरम्यान, संकर्षणनं शेअर केलेली कविता उपस्थित प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्याच्या या कवितेला त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. तसंच या कवितेच्या व्हिडीओलाही अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
