संकर्षण कऱ्हाडे मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा अनेक गोष्टी तो एकत्र हाताळत असतो. याचसह अभिनेता मालिका, सूत्रसंचालन आणि कविता या गोष्टीही करत असतो. कामाप्रती शिस्तप्रीय असलेल्या संकर्षणला अष्टपैलू अभिनेताही म्हटलं जातं. अशातच आता त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामधून त्याची कामाप्रती असलेली शिस्त, निष्ठा दिसून येते.
संकर्षण सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील तसेच कामासंबंधीत घडामोडींची माहिती तो यामार्फत देत असतो. अभिनेता अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट, चाहत्यांचे किस्से शेअर करतो ज्यामुळे तो अनेकदा चर्चेतही असतो. अशातच आता त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा किस्सा सांगतिला आहे. यामधून त्याची झालेली दगदग आणि त्याला आलेला अनुभव याबद्दल त्याने सांगितलं आहे.
प्रवास करताना संकर्षणला आला भयानक अनुभव
संकर्षणने इन्स्टाग्रामवर त्याचे प्रवासादरम्यानचे बाइकने जातानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामधून त्याने त्याच्या गाडी चालकामुळे आणि रसत्यावरील ट्रॅफीकमुळे त्याला नाटकाच्या प्रयोगाला पोहोचायला उशीर झाल्याचं म्हटलं. मग शेवटी तो त्याच्या बायकोची दुचाकी घेऊन थेट प्रयोगासाठी निघाला जेणेकरुन त्याचा वेळ वाचेल मात्र झालं काहीतरी उलटंच आणि त्याला दुचाकीने प्रवास करताना भयंकर अनुभव आला.
संकर्षण या पोस्टमधील कॅप्शनमधून म्हणाला, “धन्य ते बाइकवाले आणि धन्य त्या बाइक्स. आजचा दिवस अतिशय डेंजर गेला. मुंबईला वळसा घातला, झालं असं की माझे २ प्रयोग होते. सकाळी ११ वाजता बोरिवलीला संकर्षण व्हाया स्पृहा आणि दुपारी ४ वाजता प्रभादेवीला कुटुंब किर्रतन. मी माझ्या राहत्या घरुन (ठाण्याहून) बोरिवलीला जायला सकाळी घोडबंदर रोडचं ट्रैफिक पहाता ८.३० ला निघणं अपेक्षित होतं आणि त्याच प्रमाणे मी सकाळी ८ वाजता जेवण करून तयार होतो. माझ्या गाडीचा चालक येतोय येतोय करत ९.२० वाजता आला ११ च्या प्रयोगाला कारने जायला १ तास ५६ मिनिटं लागणार होते . म्हणजे प्रयोगाला उशीर होणार”.
दुचाकीमुळे संकर्षणची झाली दगगद
अभिनेता पुढे म्हणाला, “मी थेट बायकोची गाडी (2 wheeler) काढली आणि वेळेत पोचता येईल म्हणून निघालो. निघालो खरा पण मला आजूबाजुने जेंव्हा मोठ्या मोठ्या गाड्या जायला लागल्या , रस्त्यावरच्या छोट्या छोट्या फटीतून चाक गेल्यावर समतोल जायला लागला तेंव्हा लक्षात आलं की माझी टू व्हीलर चालवायची सवय पूर्णपणे मोडलीये, पण वेळ वाचवायचा होता. कार मधून जाताना हे साले टू व्हीलर वाले असं आपण सहज म्हणतो पण भाऊ , मुंबईत टू व्हीलर चालवणं दिव्यं आहे”.
संकर्षण हा अनुभव सांगत पुढे म्हणाला, “नाका तोंडात जाणारे नाना प्रकारचे वास आणि धूर , बाजूला ट्रक किंव्हा बस थांबली तर त्याच्या येणाऱ्या गर्रम वाफा , अर्ध्या अर्ध्या फुटावरून जाणाऱ्या मोठ्या गाड्या, त्यांचे आवाज कसातरी बोरिवलीला वेळेत पोचून तिथला प्रयोग झाल्यावर लक्षात आलं की आता बोरिवली ते प्रभादेवी हे ही अंतर आहे जातांना उन्हाने अख्खा गरम झालो होतो. गाडीच्या वेगाने डोळ्यातलं पाणी आपोआप कानात जात होतं. त्यात रस्त्यात अचानक येणारा खड्डा मणक्यांचं अचूक लोकेशन दाखवतो. रात्री ९.४५ वाजता दोन्ही प्रयोग करून जवळपास ८५ किलोमीटर टू व्हीलर चालवून ठाण्याला घरी पोचलो तेंव्हा बराच वेळ माझे पाय गाडीवरून उतरल्यावरही सीटच्याच आकाराचे राहिले होते आणि पाठीपासून पायापर्यंत मुंग्या आल्या होत्या. हेलमेटमुळे डोकं बधीर झालं होतं. देवा माझ्या मनात बाइक चालवणाऱ्यांविषयी खूपच आदरभाव दाटून आला. टू व्हीलर वाल्यांनो सांभाळून प्रवास करा बाबा तुम्ही”.
शेवटी पुढे त्याने प्रचंड मेहनत करुन आणि संयम ठेवून दोन्ही प्रयोगाला पोहोचला आणि ते प्रयोग केले असं सांगितलं. तो म्हणाला, “ह्या सगळ्यात दोन्ही प्रयोग खणखणीत झाले आणि मी मन लाऊन काम करू शकलो ही एक अत्यंत सुखाची बाब आता झोपतो शुभ रात्री”.
