Sankarshan Karhade Instagram Post : कलाकार आणि चाहत्यांचं एक अतूट नातं असतं. आपल्या आवडत्या कलाकारावर एखादा चाहता इतकं प्रेम करतो की, कधी कधी त्या प्रेमाला काही परिसीमाच राहत नाही. त्यामुळे चाहत्यांचं हे प्रेम पाहून कलाकारही अनेकदा भारावून जातात. कलाकारसुद्धा असे चाहते जपण्याचा प्रयत्न करता असतात. असाच चाहत्यांच्या प्रेमानं भारावून जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे.

लेखन, काव्य, अभिनय, दिग्दर्शन व सूत्रसंचालन अशा अनेक क्षेत्रांत आपली मुशाफिरी करणारा संकर्षण मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार आहे. आपल्या अभिनय स, काव्य आणि सूत्रसंचालनाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा संकर्षण त्याच्या स्वभावानेसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.

संकर्षण सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो अनेकदा त्याचे खास फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. तसेच तो काही खास प्रसंग, आठवणी किंवा किस्सेसुद्धा शेअर करताना दिसतो. अशातच संकर्षणने त्याच्या एका चाहतीसाठी पोस्ट शेअर केली आहे. चाहतीबरोबरचा फोटो शेअर करत त्याने तिचं कौतुक केलं आहे.

Award Banner

या पोस्टमध्ये संकर्षणने म्हटलंय, “माझी प्रेक्षक आर्या १० वी पास झाली. ९७% गुण मिळवले. उरण तालुक्यात तिचा नंबर आला आहे. बरोबर १ वर्षापूर्वी आई-बाबांबरोबर आर्या “तू म्हणशील तसं” पहायला आली होती. मी म्हणालो ‘कितवीला आहेस?’ त्यावर ती म्हणाली, ‘१० वीला आहे.’ यावर मी तिला विचारलं, ‘मग अभ्यास सोडून नाटक पहायला?’ तर म्हणाली, ‘आई-बाबा म्हणालेत, हे नाटक पाहून झालं की वर्षभर No Entertainment.’ मग मी सहज म्हणालो, ‘१० वी ला छान मार्क्स मिळवून पेढे घेऊन ये’. त्यानंतर बरोबर १ वर्षांनी आर्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाला पेढे घेऊन आली. म्हणाली, ‘दादा, ९७% मिळाले आणि रिझल्टनंतर पहिलं नाटक तुझंच पहायला आले. मला फार आनंद झाला… प्रत्येकाचा प्रवास आपापल्या मार्गाने चालू असतो. पण हे असे सुखद थांबे प्रेक्षक आणि कलाकारांचं नातं घट्टं करतात.”

दरम्यान, संकर्षणची ही चाहती आता ११वीत आहे. तिची १०वी (बोर्ड परीक्षा) मार्च २०२५ मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी झाली. त्याचा निकाल मे २०२५ मध्ये लागला. निकाल लागल्यानंतर चाहती नाटक पाहायला गेली होती. तेव्हा तिने संकर्षणसाठी पेढे नेले होते. ज्याची पोस्ट अभिनेत्याने आता शेअर केली आहे.

संकर्षणच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्याची सध्या रंगभूमीवर ‘नियम व अटी लागू’ आणि ‘कुटुंब किर्रतन’ ही दोन नाटकं सुरू आहेत. तसेच तो झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’च्या दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालनदेखील करतो.