…म्हणून ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये सान्याला घेणं टाळलं

सान्या मल्होत्रा उत्तम डान्सर देखील आहे

सान्या मल्होत्रा
‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही उत्तम डान्सर देखील आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती अनेक विद्यार्थ्यांना डान्सचे धडे देखील द्यायचे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘डान्स इंडिया डान्स’ या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याचं स्वप्न तिनं पाहिलं होतं. मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. लोकांना सांगायला माझ्याकडे कोणतीही भावनिक गोष्ट नव्हती म्हणून मला शोमध्ये घेणं टाळलं असं ती म्हणाली.

‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच्या तिच्या उमेदीच्या काळाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. मला डान्सची आवड होती. पालक मला अनेक कार्यक्रमात घेऊन जायचे तिथे मला सर्वांसमोर डान्स करून दाखवायला सांगायचे. मला ते करायला खूप आवडायचं. चित्रपटात येण्यापूर्वी मी डान्स इंडिया डान्ससाठी ऑडिशनही दिलं होतं. मी उत्तम डान्स कारायचे मात्र माझी या रिअॅलिटी शोसाठी निवड झाली नाही. आजकालच्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांकडून ज्या भावनिक कथेची अपेक्षा असते अशी कथा माझ्याजवळ नव्हती. माझं आयुष्य साधं -सरळ होतं म्हणूनच माझी निवड करणं टाळलं असं सान्या म्हणाली.

सान्या नृत्याची आवड जोपासूनच बॉलिवूडमध्ये करिअरही घडवत आहे. ‘दंगल’नंतर ‘बधाई हो’, ‘पटाखा’ चित्रपटातही तिनं काम केलं आहे. तिचा ‘फोटोग्राफ’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanya malhotra reveals she got rejected on dance india dance