बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं नुकतंच उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामला भेट देऊन दर्शन घेतलं होतं. सारा अली खानच्या या कृत्यावर बरेली येथील एका मौलानांनी तीव्र आक्षेप घेतला असून, तिच्याविरुद्ध फतवा जारी केला आहे. शरिया कायद्यानुसार मुस्लिमांनी दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात जाऊन पूजा-अर्चा करणे ‘हराम’ आणि ‘नाजायज’ असल्याचं सांगत त्यांनी साराला तोबा करण्याचा सल्ला दिला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बरेली येथील मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हे विधान केलं. मौलाना म्हणाले, “सारा अली खानच्या केदारनाथ मंदिरातील दर्शनाबाबत मला अनेक मुस्लिम तरुणांचे फोन आणि संदेश आले. शरिया कायद्यात याला परवानगी आहे का, असा सवाल त्यांनी विचारला होता. त्या पार्श्वभूमीवर मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही मुस्लिम व्यक्तीनं, मग ती स्त्री असो वा पुरुष, इतर धर्माच्या विधींमध्ये सहभागी होणं किंवा मंदिरात जाऊन पूजा करणं शरियानुसार चुकीचं आहे.”
मौलाना शहाबुद्दीन पुढं म्हणाले, “जर सारा अली खाननं स्वतःच्या मर्जीनं केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली असेल, तर तिनं शरियाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. हे कृत्य पाप मानलं जातं. त्यामुळं तिनं तातडीनं अल्लाची माफी मागून पश्चात्ताप करावा.”
केदारनाथशी साराचं जुनं नातं
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी असलेली सारा अली खान हिचा केदारनाथशी खास भावनिक नातं आहे. २०१८ मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर गेल्या चार वर्षांत सारानं अनेकदा केदारनाथला भेट देऊन तेथील छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
आपल्या या अध्यात्मिक प्रवासातून मनःशांती मिळत असल्याचे ती नेहमी सांगत असते. या वेळीही तिनं मुख्य मंदिरासह जवळच असलेल्या भुकुंट भैरव मंदिरात जाऊन विशेष पूजा आणि आरती केल्याचंही समोर आलं आहे.
वादाची ही पहिलीच वेळ नाही
विविध धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या सारा अली खानला ट्रोलींग किंवा वादाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्ये तिच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या कथानकावरून काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी विरोध दर्शवला होता. तर दुसरीकडे, तिच्या बहुधार्मिक आचरणावर आणि मंदिरांमधील दर्शनावर काही मौलवी व सोशल मीडियावरील कट्टरपंथीयांनी याआधीही अनेकदा टीका केली आहे.
दरम्यान, व्यावसायिक आयुष्यात सारा अली खान नुकतीच ‘उडता तीर’ या स्पाय-कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत दिसून आली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असून, प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
