scorecardresearch

‘सरसेनापती हंबीरराव’ २७ मे रोजी सिनेगृहात

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून हा चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची आतुरता केव्हापासून प्रेक्षकांना लागून राहिली आहे. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठय़ा उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून हा चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ऐतिहासिक चित्रपटांची लोकप्रियता आणि त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटात मराठीतील देखणा अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारत आहेत. याशिवायही अनेक दिग्गज कलाकार कसदार अशा भूमिकेतून दिसणार आहेत. संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्वीता प्रॉडक्शन्ससह शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या २७ मेला संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला रूपेरी पडद्यावर येतो आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarsenapati hambirrao cinema 27th may akp

ताज्या बातम्या