सरसेनापती हंबीरराव

ऐतिहासिक चित्रपटांची एक लाट जणू मराठी प्रेक्षकांच्या अंगावर आली आहे. शिवकालीन इतिहास सेल्युलॉईडच्या पडद्यावर अनुभवत असताना घटनाक्रम, त्याअनुषंगाने येणारे संदर्भ एकच असले तरी लेखक – दिग्दर्शकानुसार प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव ठरतो आहे.

रेश्मा राईकवार

ऐतिहासिक चित्रपटांची एक लाट जणू मराठी प्रेक्षकांच्या अंगावर आली आहे. शिवकालीन इतिहास सेल्युलॉईडच्या पडद्यावर अनुभवत असताना घटनाक्रम, त्याअनुषंगाने येणारे संदर्भ एकच असले तरी लेखक – दिग्दर्शकानुसार प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव ठरतो आहे. महाराष्ट्राचा महासिनेमाह्ण म्हणून नावाजला जावा इतक्या भव्यदिव्य पध्दतीने दृश्यमांडणी, तिखट संवाद, टाळय़ा घेणारी अ‍ॅक्शनदृश्ये अशापध्दतीचा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना देण्याची आपली इच्छा दिग्दर्शक – अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीररावह्णच्या माध्यमातून पुरेपूर पूर्ण केली आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहितेंसारखा दुर्लक्षित राहिलेला इतिहास पुरुष, त्यांनी त्या त्या वेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांबरोबर असलेल्या नात्याचे विविधांगी पैलू अशा अनेक गोष्टी लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा चारही आघाडय़ा सांभाळत केलेल्या प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीररावह्ण या चित्रपटातून उलगडत जातात. हंबीररावांचा सरसेनापती म्हणून झालेला प्रवेश, त्यासाठी कारणीभूत ठरलेला आधीचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला चारी मुंडय़ा चीत करण्याच्या वेडात सहा मावळय़ांसह गाजवलेला पराक्रम आणि त्यातच त्यांचा झालेला मृत्यू या घटनाक्रमासह हंबीररावांची ही शौर्यगाथा उलगडत जाते. हंबीरराव मोहितेंकडे सरसेनापतीपद आले ते महाराजांना राज्याभिषेक होण्याच्या अगदी काही महिने आधी.. योगायोग म्हणजे त्याच हंबीररावांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे संभाजी महाराजांनाही छत्रपतीह्ण होण्याचा सन्मान मिळाला. या दोन घटनांमध्ये शत्रूवर मात करणे आणि दक्षिण दिग्विजय साधत स्वराज्य विस्ताराबरोबरही अनेक घटना घडल्या. स्वराज्यातील अंतर्गत बंडाळी, आणाजीपंतांची भूमिका, त्यांनी केलेले कारस्थान या सगळय़ाला काही प्रमाणात बगल देत केवळ सोयराबाईंचा हट्ट आणि बहिणीच्या हट्टापायी अडचणीत आलेला भाऊ यावर लक्ष केंद्रित करत संभाजी महाराजांबरोबर दृढ होत गेलेल्या हंबीररावांच्या नात्यावरही चित्रपट प्रकाश टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज ते संभाजी महाराजांबरोबर प्रत्येक लढाईत पराक्रम गाजवत शेवटी वाईत सर्जा खानबरोबर झालेल्या लढाईत तोफगोळा अंगावर झेलून त्यांनी पत्करलेले वीरमरण इतका हंबीररावांच्या आयुष्याचा फार मोठा पल्ला या चित्रपटात आहे.

ऐतिहासिक चित्रपट साकारताना कलाकारांचा अभिनय, त्यांची शरीयष्टीवरची मेहनत, तलवारबाजी – घोडेस्वारीसाठीचे प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. इथे हंबीररावांच्या भूमिकेत असलेल्या प्रवीण तरडेंपासून गश्मीर महाजनी, राकेश बापट अशा सगळय़ाच कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसून येते. अगदी सुरुवातीच्या फ्रेममध्ये घोडे उधळत निघालेले सात वीर पाहतानाही आपण थरारून जातो. चित्रपटात काही घटना या प्रतीकात्मक पध्दतीने, काही केवळ निवेदनातून जोडून घेत ही कथा पुढे नेण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. गाण्यांचाही यासाठी उत्कृष्ट वापर झाला आहे. बहिर्जी झालेल्या अभिनेता उपेंद्र लिमयेंवर चित्रित झालेला पहिला गोंधळ हे त्याचे उत्तम उदाहरण. गाण्यातून संपूर्ण शत्रू हल्ल्याची योजना सांगणारे बहिर्जी इथे दिसतात. वर म्हटल्याप्रमाणे हंबीररावांच्या आयमुष्याचा पट मोठा असल्याने ढोबळमानाने दोन भागात चित्रपट घडतो. पूर्वार्धात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरचे हंबीरराव आणि उत्तरार्धात संभाजीराजे आणि हंबीरराव ही मामा-भाच्यांची जोडी अशा दोन वेगळय़ा टप्प्यात चित्रपट पुढे सरकतो. विषयाचा आवाकाच इतका मोठा असल्याने हंबीररावांच्या अनुषंगाने येणारा घटनाक्रम महत्त्वाचा ठरतोच. मात्र अनेकदा हंबीररावांची वैयक्तिक जडणघडण, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या सरदारांबरोबर असलेले त्यांचे नाते अशा गोष्टींना हा चित्रपट स्पर्श करत नाही. हंबीरराव आणि महाराज किंवा हंबीरराव आणि संभाजी महाराज अशा एकाच कोनातून गोष्ट फिरत असल्याने त्यांच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव काही अंशी, काही ठिकाणी मर्यादित ठरतो. त्यातल्या त्यात हंबीररावांची कन्या तारामती आणि त्यांचे संबंध किंवा तिच्या जडणघडणीचा त्यांनी केलेला वेगळा विचार असे काही आत्तापर्यंत न स्पर्शिले गेलेले ऐतिहासिक संदर्भ चित्रपट दाखवतो.

संवादांच्या बाबतीत चित्रपट सरस आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखटह्ण अशा शैलीचे जोरकस संवाद चित्रपटात ठिकठिकाणी पेरलेले दिसतात. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही भूमिकांसाठी अभिनेता गश्मीर महाजनीची केलेली निवड सार्थ ठरली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांमधील फरक आपल्या देहबोलीतून आणि कित्येकदा केवळ नजरेतून गश्मीरने दाखवून दिला आहे. बहिर्जीच्या भूमिकेत उपेंद्र लिमये यांना पाहणे हाही एक वेगळा अनुभव ठरावा, त्यांच्या आवाजाचाही सुंदर वापर चित्रपटासाठी करून घेतला आहे. राकेश बापट, श्रुती मराठे, क्षितिज दाते यांच्यासह अनेक नवे चेहरे या चित्रपटाला एक ताजेपणा देऊन जातात. खुद्द प्रवीण तरडेंनी अतिशय अभ्यासपूर्ण पध्दतीने, अत्यंत तडफेने हंबीररावांची भूमिका साकारली आहे.

संवाद, कलाकारांची अचूक निवड आणि अभिनय याबाबतीत चित्रपट सरस आहेच. मात्र या चित्रपटाचे छायाचित्रण हे त्याचे मोठे वैशिष्टय़ आणि आकर्षण ठरले आहे. उगवत्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून अघ्र्य देणारे शिवाजी महाराज – हंबीरराव मोहिते यांच्यातील दृश्य त्यामागच्या लाल गोळय़ाप्रमाणे दिसणाऱ्या सूर्यिबबामुळे अधिक धारदार झाले आहे. शत्रूला कंठस्नान घालण्याची संभाजीराजांची तऱ्हाच वेगळी होती. त्याला तलवारीच्या धारेवर उचलून धरल्यानंतर संभाजीराजांच्या मस्तकावर होणारा रक्ताचा अभिषेक असो वा हंबीररावांच्या घरात मंद दिव्यांच्या प्रकाशात घडणारा पत्नीबरोबरचा संवाद असेल.. महेश लिमये यांचा कॅमेरा अतिशय कल्पक आणि कलात्मक पध्दतीने एकेक प्रसंग आपल्यासमोर घडवत राहतो. अगदी पहिल्याच फ्रेममध्ये घोडय़ांच्या टापांबरोबर उसळणारे धुळीचे लोट आणि त्या वादळात विरलेला सात वीरांचा पराक्रम आपल्याला हलवून सोडतो. या प्रत्येक दृश्यासाठी केलेला विचार, त्याची मांडणी आपल्याला ठायी ठायी जाणवत राहते. छायाचित्रणातील महेश लिमये यांची अनुभवी आणि कल्पक नजर आपल्याला एक सुंदर दृश्यानुभव देऊन जाते. हंबीररावांची कथा सांगणारा हा ऐतिहासिकपट लांबीने थोडा जास्त आहे, अर्थात ती लांबी कंटाळवाणी नाही. मात्र अजून हंबीररावांची गोष्ट हवी होती ही जाणीव मनात कुठेतरी कायम राहते. ऐतिहासिकपटांच्या सध्याच्या लाटेतील सरसेनापती हंबीररावह्ण  हा एक देखणा आणि अभ्यासपूर्ण प्रयोगपट निश्चितच म्हणता येईल.

दिग्दर्शक – प्रवीण तरडे

कलाकार – प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, राकेश बापट, श्रुती मराठे, स्नेहल तरडे, सुनील अभ्यंकर, क्षितिज दाते, अंगद म्हसकर.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarsenapati hambirrao wave historical films like marathi audience shiva period history ysh

Next Story
‘प्रवाहाबरोबर पोहायला आवडलं’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी