scorecardresearch

“अशा प्रवृत्तीला यापुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही”, साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटींगला नाकारली परवानगी

किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने एक परिपत्रक जारी केले आहे.

अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पुढे येऊन पाठिंबा दिला. तर दुसरीकडे राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आलं असल्याच्या आरोपाचं निर्मात्यांनी मात्र खंडन केलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता गुळुंब ग्रामपंचायतीने मालिकेच्या चित्रीकरणास परवानगी नाकारली आहे. त्यांनी नुकतंच याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे त्या ग्रामपंचायतीने मालिकेचे चित्रीकरण करण्यात परवानगी नाकारली आहे. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी याबाबतचं पत्र ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या टीमला पाठवले आहे.

“चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात, मी बी कंबर कसलेली हाय…”, अभिनेते किरण मानेंची नवीन पोस्ट चर्चेत

“राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये की, महाराष्ट्रात अजनूही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही”, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान याबाबत स्टार प्रवाह किंवा मुलगी झाली हो या मालिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच यापुढे हे चित्रीकरण कुठे होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satara gulumb grampanchayat denied permission for shooting star pravah mulgi zali ho serial after kiran mane remove nrp

ताज्या बातम्या