सध्याच्या घडीला तरुणींच्या छेडछाडीचे अनेक प्रकार समोर येत असताना छोट्या पडद्यावरील कलाकाराने वास्तवात हिरोची भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. मढ आयलंड येथील तरुणींचे चोरुन फोटो काढणाऱ्या टवाळखोर तरुणांना अमर उपाध्यायने धडा शिकवला आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेल्या अमर उपाध्यायने तरुणींवर होणाऱ्या अन्याय रोखून खऱ्या हिरोची भूमिका निभावली असेच म्हणावे लागेल. ‘साथिया साथ निभाना’ या मालिकेचे सध्या मढ आयलंड येथे चित्रीकरण सुरु आहे. मालिकेच्या चित्रीकरणा वेळी अमर उपाध्यायने आयलंडवर तरुणींचे फोटो काढणाऱ्या टवाळखोर तरुणांना रोखून समाजाला महिलांविरोधातील अत्याचारांविरोधात जागृकतेचा संदेश दिला आहे.

चित्रीकरणादरम्यान, तीन टवाळखोर तरुण समुद्र किनाऱ्यावरील तरुणींचे फोटो काढताना अमरने पाहिले. हे तरुण त्यांच्यासोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अमरने त्यांच्याजवळ जाऊन तरुणींचे काढलेले सर्व फोटो डिलिट करायला सांगितले. यावेळी या टवाळखोर तरुणांसोबत त्याची शाब्दिक चकमकही झाली. ते तरुण फोटो डिलेट करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने या तरुणांच्या हातातील कॅमेरा हिसकावून फोटो डिलिट केले.

याप्रकरणाविषयी टाइम्सऑफ इंडियाशी बोलताना अमर उपाध्याय म्हणाला की,  पहिल्यांदा हे तीन तरुण   फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेत असल्याचे वाटले. पण काही वेळानंतर त्याचा फोटो काढण्याच्या विकृत प्रकार माझ्या लक्षात आला. जबाबदार नागरिक म्हणून मी या विकृतीविरोधात पुढाकार घेतला. यावेळी समाजातील महिलांविरोधातील विकृत प्रकार थांबविण्यासाठी पुरुषांनी समोर यावे, असे आवाहन देखील केले. छोट्या पडद्यावरील अभिनयाने घराघरातील हिरोने वास्तवातील हिरोगिरीमुळे एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. आत्मरक्षणासाठी महिलांनी जागृक असायला हवे, असा संदेशही त्याने यावेळी दिला.

काहीदिवसांपूर्वी केरळमधील अभिनेत्री भावना हिच्यावर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. अभिनेत्रींवर ओढावलेल्या प्रसंगानंतर  चित्रपटसृष्टीतून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसले होते. मल्याळम, तेलगू आणि बॉलिवूडमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता अमर उपाध्यायने कलाकार मंडळी महिलाविरोधाती घटनांवर फक्त बोलतच नाहीत, तर वेळप्रसंगी अशा घटना रोखण्यासाठी देखील पुढाकार घेतात हे दाखवून दिले आहे. अमर उपाध्याय हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. ‘देख भाई देख’, ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’, ‘साथिया-प्यार का नया एहसास’ या सारख्या लोकप्रिय मालिकेतून अमर घराघरामध्ये पोहोचला आहे. बॉलिवूडमधील ‘एल ओ सी कारगिल’ या चित्रपटात अमर उपाध्याय कॅप्टन विजयनाथ थापर यांची व्यक्तिरेखा साकारली होती.