संजय दत्त बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या कामासाठी तर ओळखला जातोच, पण त्याचा मनमोकळ्या स्वभावमुळेही त्याला अनेक जण पसंत करतात, कायम इतरांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या संजय दत्तचं अनेकदा इतर कलाकार मंडळीसुद्धा कौतुक करत असतात. अशातच आता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी त्याच्याबरोबरचा किस्सा सांगितला आहे.

सतीश राजवाडे यांनी आतापर्यंत अनेक नाटक, चित्रपटांत काम केलं आणि त्यांचं दिग्दर्शनही केलं आहे. आतापर्यंत त्यांनी प्रेमकहाणीवर आधारित अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत आणि त्यांचे हे सर्व चित्रपट हिटसुद्धा ठरले आहेत. त्यांनी संजय दत्तबरोबर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’मध्ये काम केलं होतं. अशातच आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

सतीश राजवाडे यांनी यावेळी संजय दत्तच्या मोठेपणाचं कौतुक केलं आहे. एका चित्रपटात केवळ काही मिनिटं सीन केलेल्या सहकलाकारालाही त्याने लक्षात ठेवलं आणि पाहिल्यानंतर स्वत: ओळख दाखवली असं म्हणत त्याचं कौतुक करत गोरेगाव फिल्मसिटीमधील त्याच्याबरोबरचा किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी ‘वास्तव’ चित्रपटात महेश मांजरेकर आणि संजय दत्तबरोबर काम करण्याचा अनुभवसुद्धा सांगितलाय.

मुलाखतीत सतीश राजवाडे यांना ‘वास्तव’ चित्रपटात काम केल्याचा अनुभव विचारल्यानंतर ते म्हणाले, “आम्ही महेश सरांच्या ऑल द बेस्ट नाटकात काम करायचो. आम्ही महेश सरांचे खूप मोठे फॅन आहोत. वास्तवमध्ये जी गँग आहे ती सर्व मराठी रंगभूमीवरची गँग आहे. त्यांनी सांगितलं होतं की उद्यापासून शूटिंगला यायचं त्यामुळे आम्ही शूटिंगला गेलो होतो.”

सजंय दत्तबरोबरचा अनुभव विचारल्यानंतर ते म्हणाले, “तो आमच्याबरोबर खूप गप्पा मारायचा. तो इतका मोठा माणूस आहे आता वास्तवला २० वर्षे झाली आहेत, पण फिल्मसिटीचा किस्सा आहे. आम्ही फिल्मसिटीत उभे होतो आणि मागून जोरजोरात हॉन वाजला. सगळ्यांनीच मागे बघितलं तर संजय दत्त खिडकीतून मला हात दाखवत होता. असं करण्याची त्याला काहीच गरज नव्हती इतका मोठा माणूस आहे तो, इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे पण, मी फक्त ७ ते ८ मिनिटं चित्रपटात काम केलं पण इतक्या वर्षांनंतरही त्याने कसा आहेस सत्या असं विचारलं त्याला आता कदाचित आठवेल की नाही माहीत नाही. पण पाच वर्षांपर्वीचा किस्सा आहे हा”.

सतीश राजवाडे पुढे म्हणाले, “इतकं सगळं मी या मोठ्या माणसांकडून शिकलोय. की तुम्ही कोणाबरोबर काम करताय हे सगळं लक्षात ठेवण. महत्त्वाचं असतं. स्वताहून गाडीचा हॉन वाजवून खिडकीतून हात दाखवून छोट्या सहकलाकाराशी बोलणं. न बोता खूप काही शिकवून गेला.”