Sayali Raut buys new house in Mumbai: स्वत:चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांना बरीच वर्षे वाट पाहावी लागते. अनेक कलाकारदेखील स्वत:चे घर घेतल्यानंतर आनंद व्यक्त करतात. आता लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सायली राऊतचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सायली सोशल मीडियावर विविध रील्स शेअर करत असते. या रील्समधून ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. कधी लहान मुलगी, खोडकर मुलगा, शेजारची काकू, रागावलेली आई, कॉलेजमधील मुलगी अशा विविध भूमिका ती साकारत असते. अचूक निरीक्षणामुळे अशा भूमिका लोकांना त्यांच्या आसपासच्या वाटतात. आता सायलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

“आपलं स्वतःचं घर असेल तेव्हा…”

सायली राऊतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. गृहप्रवेश आणि पूजेचे हे फोटो आहेत. तिच्याबरोबर तिचा नवरादेखील आहे. सायलीने लिहिले, “मुंबईत स्वतःचं घर असावं, हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असते. मीही त्याला अपवाद नाही. पण, जशी मोठी झाले, थोडी अक्कल आली. तशी जाणीव झाली की, मुंबईत घर घेणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.”

पुढे तिने लिहिले, “माझं घर लहान होते. आम्ही पाच माणसे त्या घरात राहत होतो. कधी मला त्याचा न्यूनगंड नव्हता. चाळीतील लोक जीवाला जीव देणारी होती. दारं सताड उघडी असायची. मजल्यावरची सगळी घरं आपलीच असायची. घरात कितीही पाहुणे आले तरी अॅडजस्ट होऊन जायचं.”

“‘मुंबईतली घरं फार लहान असतात. ‘आम्ही पाच माणसं राहतो घरात, चालताना एकमेकांना आपटतो’ हा स्टँडअपमधील माझा पंच होता. एक दिवस धाडसच केलं आणि टोकन अमाउंट भरूनच टाकली. मेहनत करू आणि पुढची आर्थिक गणितं सोडवू, असा विचार केला. अखेरीस स्वत:च्या घरात गृहप्रवेश केला.”

पुढे तिने लिहिले, “मी आणि विनीत (सायलीचा पती)ने कॉलेजमध्ये असल्यापासून स्वप्नं बघितली होती. आपलं स्वतःचं घर असेल तेव्हा आपण काय करू, हे ठरवलं होतं.”

पुढे कृतज्ञता व्यक्त करीत तिने लिहिले, “आपण सोशल मीडियावरील जे अडीच लाख फॉलोअर्सचे जे कुटुंब म्हणतो, त्यांच्याबरोबर हे शेअर करताना खूप छान वाटत आहे. सगळ्यात मोठं थँक्यू माझ्या पालकांना. कारण- त्यांनी मला चांगले संस्कार दिले, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि या निर्णयात सर्व परीने ते माझ्या पाठीशी उभे राहिले.”

शेवटी तिने लिहिले, “सध्या परत शून्यापासून सुरुवात करायची आहे. आनंद आहे, समाधान, आशा आहे. रील्स शूट करण्यासाठी खूप जागा आहे आणि उद्या भाजी कोणती करायची आहे, हा प्रश्न आहे.”

सायलीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिचे कौतुक करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.