बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता म्हणजे अनुपम खेर. आज त्यांच्या ६५ वा वाढदिवस. अनुपम यांनी वयाच्या २८ व्या वर्षीची करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी सुरु केलेला प्रवास आजही कायम आहे. जवळपास ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचं दिसून येतं. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या अनुपम यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. त्यांच्या प्रोफेशनल लाइफ इतकीच त्यांची पर्सनल लाइफसुद्धा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. अनुपम यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. त्यामुळेच त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं. प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली. मात्र, यावेळी दोघांचंही लग्न झालं होतं. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होती. यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. स्ट्रगल काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांच्या पतीपासून गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते. त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:च नाव दिलं.

वाचा : यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला करोनाचा फटका

दरम्यान, अनुपम खेर यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या राम लखन या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच त्यांनी ‘लम्हे’, ‘खेल’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘विजय’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातंमध्ये काम केलं आहे.