सुप्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या घरातच गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लंकेश यांचा जीव घेणारे लोक कोण, असा सवाल सेलिब्रिटींनी केला आहे.

लंकेश यांच्यावर कोणी हल्ला केला? हल्ल्यामागचं मुख्य कारण काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. त्यांच्या हत्येच्या घटनेची माहिती समजताच समाजमाध्यमांवरूनही त्याचा निषेध करण्यात येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. लंकेश यांच्या हत्येनंतर गीतकार जावेद अख्तर, अतुल कसबेकर, शिरीष कुंदर यांनी ट्विटरवरून या घटनेचा निषेध केला.
माध्यमांमध्ये मांडली जाणारी मतं आणि सद्यपरिस्थितीवर जावेद अख्तर यांनी ट्विट केलंय, ‘डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश. जर अमुक एका विचारसरणीच्याच व्यक्तींचा जीव जात असेल तर, जीव घेणारे लोक कोण?…’ असा संतप्त सवाल अख्तर यांनी केला आहे. अतुल कसबेकर यांनीही लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा लवकरत लवकर शोध घेण्यात यावा, अशी मागणी केली. अनुभव सिन्हा यांनीही एका महत्त्वाच्या निर्णयाची अपेक्षा असल्याचं म्हणत लंकेश यांना न्याय मिळावा, असे म्हटले आहे.

निर्भीड भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर #GauriLankesh असा हॅशटॅगही ट्रेंड झाला. देशात उजव्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या आणि लिखाण करणाऱ्या विचारवंतांची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांचीही हत्या झाली होती.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?