सप्टेंबर महिना सिनेप्रेमींसाठी खास आणि मनोरंजनाने भरलेला ठरणार आहे. पुढील महिन्यात बॉलीवूडसह साऊथचे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये क्राइम ड्रामा, अॅक्शन, सायकॉलॉजिकल थ्रिलर, हॉररपासून रोमँटिक आणि फँटसी चित्रपटांपर्यंत विविध जॉनरचा समावेश आहे. चला तर मग, सप्टेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांची संपूर्ण यादी जाणून घेऊया.
मिर्झापूर : द मूव्ही
‘मिर्झापूर’ या लोकप्रिय ओटीटी सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता या फ्रँचायझीची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मिर्झापूर : द मूव्ही’मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू आणि श्वेता त्रिपाठी हे कलाकार पुन्हा आपल्या लोकप्रिय भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय रवी किशन आणि जितेंद्र कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केलं असून, ‘मिर्झापूर’च्या जगातील सत्ता, सूड आणि संघर्षाची कथा यावेळी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मिर्झापूर : द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हैवान
अक्षय कुमार और सैफ अली खान तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यावेळी दोघेही एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’मध्ये सैफ अली खान दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका साकारत आहे, तर अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘हैवान’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट ही भारतीय लोककथा आणि पौराणिक घटकांवर आधारित फँटसी-थ्रिलर असल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटात प्रेक्षकांना एक रहस्यमय जंगल आणि त्याच्याशी जोडलेल्या दैवी शक्तींची अनोखी कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये यापूर्वी अनेकदा बदल करण्यात आले होते. आता ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ २५ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दायरा
मेघना गुलजार दिग्दर्शित आणि करीना कपूर व दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दायरा’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात दोघेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार असून, एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांचे मार्ग वेगवेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. चित्रपटाची कथा सत्य घटनांपासून प्रेरित असून, यात न्याय, सत्य आणि नैतिकतेच्या विविध पैलूंवर भाष्य करण्यात आलं आहे.असं म्हटलं जातंय. १८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
द पॅराडाईज
दाक्षिणात्य अभिनेता नानी आणि श्रीकांत ओडेला दिग्दर्शित ‘द पॅराडाईज’ या अॅक्शन-ड्रामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘दसरा’नंतर नानी आणि श्रीकांत ओडेला ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. चित्रपटाची कथा १९८०च्या दशकातील सिकंदराबादच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय, एका वंचित समुदायाचा भेदभाव आणि दडपशाहीविरोधातील संघर्ष यात पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
इम्मॉर्टल
जी. व्ही. प्रकाश कुमार आणि कयादू लोहार यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘इम्मॉर्टल’ हा तमिळ भाषेतील हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. मरियप्पन चिन्ना यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये प्रेम, रहस्य या गोष्टी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सरदार २
‘सरदार २’ हा अॅक्शन-स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. पी.एस. मिथ्रन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात कार्ती पुन्हा आपल्या दुहेरी भूमिकेत दिसणार असून, एस.जे. सूर्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मालविका मोहनन, आशिका रंगनाथ आणि राजिशा विजयन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सरदार २’ १० सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
