इस्लाम धर्मानुसार लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली नसते आणि हा एक करार आहे असं अभिनेत्री शबाना आजमी मानतात. उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये घटस्फोटाच्या योग्य पद्धती शिकवण्याबाबतचा एक लेख शेअर करत त्यांनी ट्विट केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘इस्लाम धर्मानुसार लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या नसून हा एक करार असतो. आम्हाला एका आदर्श ‘निकाहनामा’ची गरज आहे ज्यामध्ये कराराची कलमे नि:पक्षपातीपणे मांडलेली असतील.’

लेखक- गीतकार जावेद अख्तर यांची पत्नी शबाना नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर आपली मतं परखडपणे मांडताना दिसतात. गेल्या आठवड्यात त्यांनी तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत हा देशातील धाडसी मुस्लिम महिलांचा विजय आहे असं म्हटलं होतं.

वाचा : ‘केबीसी’च्या मंचावर जयपूर पिंक पँथर्स म्हणणार ‘खेल कबड्डी’

शबाना आजमी ‘मिजवान वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेशी संलग्न आहेत. या संस्थेची सुरुवात त्यांचे वडील कैफी आजमी यांनी केली होती. महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि चिकनकारी कारागीरांच्या कलेला पुनरुज्जीवन देण्याच्या उद्देशाने या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती करण्यात आली.