जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे. http://www.azmikaifi.com या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. ही वेबसाइट बघण्याचे आवाहन शबाना आझमी यांनी त्यांच्या टि्वटर खात्यावरून केले आहे. कैफी आझमी – एक विद्रोही कवी असे शीर्षक असलेली ही वेबसाइट ‘दी लिजंड’, ‘कलेक्शन’, ‘ट्रिब्युट’, ‘मिजवान’ आणि ‘प्रेस’ अशा पाच भागात विभागलेली आहे. यातील ‘लिजंड’ भागात कैफी आझमी यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत प्राप्त केलेले यश, चित्रपटसृष्टीसाठीचे त्यांचे योगदान आणि हैदराबादशी असलेला त्यांचा संबंध याची माहिती या ठिकाणी पुरविण्यात आली आहे. ‘कलेक्शन’ विभागात त्यांच्या प्रसिद्ध गझल्स, कविता आणि गाण्यांचे ऑडिओ व व्हिडिओ देण्यात आले आहेत. मिजवानमध्ये आझमगढमधील छोट्याशा खेडेगावासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली आहे. शबाना आझमी आणि तिचे वडील कैफी आझमी यांचे बरेच दुर्मिळ फोटोदेखील या वेबसाइटवर पाहायला मिळतात.