Shabana Azmi On Hindu Muslim Controversy: भारतामध्ये सध्या रंगलेल्या हिंदू-मुस्लीम धार्मिक वादावर आणि समाजात पाडल्या जाणाऱ्या फुटीवर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मौन सोडले आहे. पती जावेद अख्तर आणि स्वतःवर दोन्ही बाजूंच्या धर्मांधांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, कधी मौलवी आमच्या विरोधात फतवा काढतात, तर कधी आम्हाला दहशतवादी म्हटले जाते. परंतु, ही लढाई हिंदू आणि मुस्लीम यांच्यात नसून ती उदारमतवादी विरुद्ध कट्टरपंथी अशी आहे. भारताची खरी ताकद ही सांस्कृतिक विविधतेत असून धर्माच्या नावावर फूट पाडणे संविधानाच्या विरोधात असल्याचं शबाना आझमी म्हणाल्या.

शबाना आझमी आणि जावेद अख्तर भारतातील हिंदू-मुस्लीम वादावर नेहमीच त्यांची मतं जाहीरपणे मांडत असतात. पण खरी लढाई हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नसून उदारमतवादी आणि कट्टरपंथी यांच्यात आहे, असं शबाना आझमींनी म्हटलंय. ‘झूम’शी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या, “दोन्ही समाजातील कट्टर लोक मला आणि जावेद दोघांनाही सहन करू शकत नाहीत. कट्टर हिंदू कट्टर आणि कट्टर मुस्लीम लोकांना आम्ही आवडत नाही. यावरूनच आमची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते, असं आम्हाला वाटतं. कारण कधी एखादा मौलवी आमच्याविरोधात फतवा काढतो, तर कधी कोणी आम्हाला दहशतवादी म्हणतं.”

समाजात फूट पाडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होतात – शबाना आझमी

धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन मूळ मुद्दा समजून घेणं ही काळाची गरज असल्याचं शबानी आझमींनी म्हटलंय. “आपल्याला या हिंदू-मुस्लीम वादाच्या पलीकडे जावं लागेल. समाजात फूट पाडण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, त्या खड्ड्यात आपण न पडणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. ही लढाई हिंदू आणि मुस्लीम यांच्यात नसून उदारमतवादी आणि कट्टर लोकांमध्ये आहे, हे आपण समजून घेण्याची गरज आहे. उदारमतवादी हिंदू आणि मुस्लीम एका बाजूला आहेत, तर कट्टर हिंदू आणि मुस्लीम दुसऱ्या बाजूला आहेत. तुम्ही जेव्हा याकडे या दृष्टिकोनातून पाहाल, तेव्हाच धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे विष दूर होईल,” असं शबाना आझमी म्हणाल्या.

सांस्कृतिक विविधता हाच खरा भारत – शबाना आझमी

स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “धर्माच्या आधारावर फूट पाडणं हे भारताच्या संस्कृतीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. हे भारताचं मूळ नाही. खरा भारत म्हणजे सांस्कृतिक विविधता आहे. आम्ही आयुष्यभर हीच संस्कृती सेलिब्रेट केली आहे. माझ्या कुटुंबाने नेहमीच भारताच्या विविधतेचा आदर केला आहे.”

याच मुलाखतीत शबाना आझमी यांनी राजकुमार संतोषी यांच्या ‘बटवारा १९४७’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दलही प्रतिक्रिया दिली. सध्याच्या वातावरणामुळे ‘गदर’ फेम सनी देओलला एका मुस्लिी पात्राच्या भूमिकेत प्रेक्षक स्वीकारू शकले नाहीत, त्यामुळे हा चित्रपट आपटला असं मत त्यांनी व्यक्त केलं.