शाहरूखसाठी अन् त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की ट्विटरवर भारतातील सर्वाधिक फॉलो केल्या गेलेल्या अभिनेत्यांच्या यादीत तो अव्वल ठरला आहे. त्याचे ट्विटरवर ३४ मिलिअन म्हणजेच ३ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. यात त्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकलं आहे.

गेल्याच महिन्यात शाहरूखच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या ३ कोटी ३० लाख इतकी होती. त्यावेळी शाहरुखनं ट्विटर आणि इन्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. शाहरुख ‘झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. शाहरूख फक्त भारतातलाच नाही तर जगातील सर्वाधिक फॉलो केल्या गेलेल्या ट्विटरच्या यादीत ३८ व्या क्रमांकावर आहे. तर बिग बींचा क्रमांक यात ४० वा लागतो. ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचे सध्याच्या घडीला ३ कोटी ३४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

यापूर्वी अमिताभ बच्चन यांचं नाव ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या गेलेल्या अभिनेत्यांच्या यादीत आघाडीवर होतं. भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत. ट्विटरवर त्यांचे ४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यानंतर अनुक्रमे  शाहरुख, अभिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार या अभिनेत्यांना ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलं जातं.