Jawan Director Atlee : २०२३ मध्ये बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने ‘जवान’ सिनेमातून दमदार कमबॅक केलं. ‘जवान’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या सिनेमात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनताराची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. तर हा सिनेमा दिग्दर्शित करणारा तामिळ दिग्दर्शक अ‍ॅटलीचंही विशेष कौतुक झालं.

दिग्दर्शक अ‍ॅटलीनं नुकतीच एक खुशखबर शेअर केली आहे. अ‍ॅटली लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. खास पोस्ट शेअर करत त्यानं ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे. पत्नीबरोबरचे फोटो शेअर करीत त्यानं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

सोशल मीडिया शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमधील पहिल्या फोटोमध्ये, प्रिया आणि अ‍ॅटली यांच्यासह त्यांचा तीन वर्षांचा मुलगा मीर दिसतोय. तर इतर फोटोंमध्ये प्रिया आणि अ‍ॅटली एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत. तसंच शेवटच्या फोटोमध्ये दोघे त्यांच्या पाच पाळीव प्राण्यांसह दिसत आहेत.

शेवटच्या पोस्टवर अ‍ॅटली-प्रिया यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त करत म्हटलंय, “आमच्या घरात आणखी एक सदस्य येत आहे. हो! आम्ही पुन्हा आई-बाबा होणार आहोत. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद हवे आहेत. अ‍ॅटली, प्रिया, मीर, बेकी, युकी, चॉकी, कॉफी आणि गुफी आम्हा सर्वांना प्रेम मिळूदे.”

तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये अ‍ॅटली-प्रिया असं म्हणतात, “आमच्या घरात लवकरच आणखी एक सदस्य येणार आहे, त्यामुळे आमच्या घरात आणखी आनंद येणार आहे. आम्ही पुन्हा आई-बाबा होणार आहोत. तुमचे सर्व आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना हवे आहेत.”

दरम्यान, अ‍ॅटली-प्रिया यांनी आईबाबा झाल्याची गुडन्यूज शेअर करताच दाक्षिणात्य कलाविश्वातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समांथा रुथ प्रभूने “दोघांचं खूप खूप अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तर कीर्ती सुरेशने “दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना एकत्र भेटण्याची आतुरता आहे. खूप प्रेम”, असं म्हटलंय. शिवाय जान्हवी कपूर आणि करण जोहर यांसह बॉलीवूडच्या इतर कलाकारांनीसुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अ‍ॅटली-प्रिया यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी त्याचा जन्म झाला होता. पहिल्या लेकाच्या जन्मानंतर आता तीन वर्षांनी अ‍ॅटली-प्रिया नव्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दरम्यान, दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तो ‘राजा राणी’, ‘थेरी’, ‘मर्सल’, आणि ‘बिगिल’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर त्यानं शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. त्याचा हा चित्रपट हिंदी सिनेमांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. दिग्दर्शनाबरोबरच अ‍ॅटली निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटातून तो निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.