चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आडाखे बांधताना आघाडीच्या खान मंडळींचा कमालीचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. एकतर त्यांचे चित्रपट मोठे, या चित्रपटाला जास्तीतजास्त वेळ चित्रपटगृहात राहता यावं यासाठी सुट्टीचे मुहूर्तही तसे मोजून तीन-चारच असतात. त्यामुळे आहे त्या सुट्टय़ांचा विचार करून आपल्या चित्रपटांसाठी योग्य तारीख शोधणं ही त्यांच्यासाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. सलमान खानने नियमाप्रमाणे ईदचा मुहूर्त घेतला आहे. आमिरही नाताळशिवाय येणार नाही. म्हटल्यावर आपल्या चित्रपटासाठी दिवाळीची वाट न पाहता शाहरूखने दोन आठवडय़ांची निश्चिती असेल असा मुहूर्त शोधून काढला आहे.
चित्रपटाच्या मार्केटिंगचा विचार करता शाहरूखचा हात कोणीही धरू शकत नाही हे त्याने वारंवार सिद्ध केलं आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित, अनुष्का शर्माबरोबरचा त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ प्रदर्शनासाठी सिद्ध झाला आहे. एकतर या चित्रपटातून अनुष्का आणि शाहरूख तिसऱ्यांदा एकत्र येताहेत. त्यात इम्तियाजबरोबर या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. पंजाबपासून स्पेन आणि परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित झालेला हा चित्रपट प्रदर्शनासाठीची तयारी करतो आहे. त्यात जुलैमध्ये ‘टय़ूबलाइट’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता ओसरायला काही आठवडे द्यावे लागतील. मग आपला चित्रपट कधी प्रदर्शित करायचा?, याचा निर्णय घेताना थेट १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त शोधणं त्याच्यासाठी सोपी गोष्ट होती. मात्र या वेळी असा कुठलाही मुहूर्त न शोधता आपला चित्रपट एक आठवडा आधी प्रदर्शित करायचा निर्णय त्याने घेतला आहे.




१५ ऑगस्टला शाहरूख खानचा हा चित्रपट आणि अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार होते. दोन्ही चित्रपटांचा विषय वेगळा असल्याने त्याचे आपापले प्रेक्षकवर्ग आहेत. हे लक्षात घेऊन शाहरूखने आपल्या चित्रपटासाठी ४ ऑगस्टची निवड केली आहे. त्याचा दुहेरी फायदा शाहरूखला होणार आहे. एकतर त्या आठवडय़ाच्या शेवटी रक्षाबंधन आहे आणि दुसऱ्या आठवडय़ात स्वातंत्र्य दिनाची सुट्टी. त्यामुळे चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन आपल्या चित्रपटाला दोन आठवडे मिळतील, याची खबरदारी त्याने घेतली आहे.