बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या लोकप्रियतेत घट झाल्याची चर्चा होत होती. अनेक जाहिरातींनी देखील शाहरुखकडे पाठ फिरवली होती. शाहरुख खान हा भारतातील सर्वात प्रिय ‘ब्रँड’पैकी एक आहे आणि ड्रग्ज प्रकरणामुळे त्याच्या जाहिराती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. मात्र त्याची कॉर्पोरेट्समधील लोकप्रियता कमी झालेली नाहीत, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी एका अहवालातून स्पष्ट केले आहे.

कथित ड्रग्स प्रकरणात त्याचा मुलगा आर्यन खानच्या अटकेवरून वाद सुरू झाल्यानंतर काही कंपन्यांनी किंग खानच्या जाहिराती ब्लॉक केल्या होत्या. त्यापैकी अनेक आता पडद्यावर परतल्या आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सचे मुख्य मार्गदर्शक संदीप गोयल म्हणाले, “शाहरुख हा भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे त्याच्यावर काही काळ परिणाम झाला, पण त्यामुळे त्याची जनमाणसातील प्रचंड लोकप्रियता कमी झालेली नाही. दरम्यान, शाहरुख पुन्हा जाहिरातींमध्ये दिसायला लागला आहे. एका जाहिरात फर्मच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे ब्रँड शाहरुख खानसोबत जाहिरात करतात, त्यांना त्याचे व्यक्तिमत्त्व आणि आकर्षकपणाचा फायदा होतो. तसेच शाहरुख खान हा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करतो.

शाहरुख हा ब्रँडसाठी लोकप्रिय पर्याय आहे. त्याने यापूर्वी डिश टीव्ही, ह्युंदाई, पेप्सी, डी’डेकोरसह अनेक ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. कॅडबरी चॉकलेट्स बनवणारी आघाडीची कन्फेक्शनरी कंपनी मॉंडेलेझ इंडियाने अलीकडेच शाहरुखच्या सणांच्या जाहिरातींची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. मुलाला ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर किंग खानची ही पहिली मोठी जाहिरात आहे.

एकंदरीत ड्रग्ज प्रकरणामुळे उद्भवलेल्या वादानंतर शाहरुख अभिनीत जाहिराती बंद करणाऱ्या एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजूनेही पुन्हा त्याच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. शिवाय विमल पान मसाला आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या जाहिरातीतही शाहरुख परतला आहे.