बॉलीवूड किंग खानच्या ‘फॅन’ चित्रपटातील जबरा गाणे सध्या बरेच गाजत आहे. शाहरुखचा अतिशय वेगळा लूक आणि त्याने या गाण्यावर धरलेला ठेका यामुळे तर हे गाणे आणखी आकर्षित करते. त्यामुळे या गाण्याला आणखी जास्तीत जास्त प्रसिद्ध मिळावी म्हणून यशराज फिल्मसने हे गाणे सात विविध भाषांमध्ये प्रदर्शित केले आहे. आता मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती, भोजपुरी आणि पंजाबी या सात भाषांमध्ये हे गाणे ऐकण्यास मिळेल.
गुजरातीत अरविंद वेगडा, बंगालीत अनुपम रॉय, भोजपूरीत मनोज तिवारी, पंजाबीत हरभजन मान, तमिळमध्ये नक्श अजीज ह्यांनी तर मराठीत अवधूत गुप्तेने हे गाणे गायले आहे. मराठीतील या गाण्याचे बोल ‘मी तुझा हाय रे जबर होय रे जबरा फॅन झालोया..’ असे असून त्यास प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूरने लिहले आहेत. तर या सर्वच गाण्यांना विशाल-शेखर या संगीतकार जोडीने संगीत दिलेय. स्वतः शाहरुख खानने सात भाषांमधील या गाण्याचे व्हिडिओ ट्विट केले आहेत.
‘फॅन’ हा चित्रपट येत्या १५ एप्रिलला प्रदर्शित होईल.