करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यात विदारक चित्र निर्माण झालंय. अनेक ठिकाणी रूग्णालयात रूग्णांना बेड्स मिळत नाहीत, तर ऑक्सिजन अभावी तडफडून अनेकांचे जीव जातायत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडकरांकडून मदतीचा ओघ सुरू झालाय. बॉलिवूडचा ‘मसिहा’ सोनू सूद, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, आयुषमान खुराना, अजय देवगण पाठोपाठ आता अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर हे दोघेही मदतीसाठी सरसावले आहेत.

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा कपूर हीने नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन केलंय. मीरा कपूर हिची बहिण नूर आणि भाऊजी मोहनीश वधवानी यांनी करोना काळात पिडीतांच्या मदतीसाठी आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ‘Breathe For India’ आणि ‘Billion Breath Movement’ या मोहीम सुरू केल्या आहेत. या मोहीमेत देणगी जमा करण्यासाठी अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर या दोघांनी पुढाकार घेतलाय. या मोहिमेबद्दल लोकांना सांगण्यासाठी मीरा कपूरने हे लाईव्ह सेशन केलं. इन्स्टाग्रामवर लाईव्ह असताना मीरा कपूरने या मोहिमेबद्दल सर्व माहिती दिली. तसंच बहिण नूर आणि भाऊजी मोहनीश वधवानी या दोघांनाही तिने या लाईव्हमध्ये आमंत्रित केलं होतं.

लाईव्हमध्ये बोलताना मीरा कपूरने breath movement मोहिमेतून अनेक करोना पिडीतांना कशा प्रकारे मदत केली जाते, हे देखील सांगितलं. पत्नी मीरा कपूरने घेतलेल्या या निर्णयाला पाठिंबा देत अभिनेता शाहिद कपूरने तिचा हा व्हिडीओ ‘Give India’ नावाच्या पेजवर शेअर केला.

Instagram: @shahidkapoor

 

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर हे दोघेही त्यांच्या सोशल अकाऊंटवरून करोना काळातली उपयुक्त माहिती फॅन्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मीरा कपूर देखील तिच्या सोशल मिडीया अकाऊंटचा वापर करोना काळातील गरजूंना मदत करण्यासाठी करताना दिसून येतेय.