शाहिद कपूर आणि मीरा राजपूत सध्या मुंबईत नव्या घराच्या शोधात आहेत. वांद्रे परिसरात एखादे अलिशान घर घेण्याचा या जोडप्याचा विचार आहे. शाहिद आणि मीरा सध्या जुहू येथील सी-फेसिंग अपार्टमेन्टमध्ये राहत आहेत. ‘स्पॉटबॉय डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता शाहिद आणि मीराला राहते घर बदलून अधिक उच्चभ्रू ठिकाणी राहायला जायचे आहे.

शाहिदची ‘किस्मत कनेक्शन’ची सहकलाकार विद्या बालनही सध्या जुहू येथील अपार्टमेन्टमध्ये त्यांची शेजारी आहे. पण आता तर शाहिद वांद्रे येथे राहायला गेला तर त्यांचा शेजारी असेल रणबीर कपूर. रणबीरने पाली हिल येथील त्या अपार्टमेन्टमध्ये २०१५ मध्ये एक घर घेतले होते. कतरिना आणि रणबीर ‘लिव्ह इन’मध्ये असताना या घरी राहत होते. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर रणबीरने ते घर सोडले.

शाहिद आणि मीराला ते अपार्टमेन्ट फार आवडले असून, या इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावर त्यांनी घर घेण्याचे ठरवले. शाहिद आणि मीरा हे घर फक्त एक गुंतवणूक म्हणून घेणार आहेत की भविष्यात त्यांचा त्या घरी राहायला जाण्याचा विचार करतील हे मात्र अजून कळू शकले नाही.

शाहिदने २०१४ मध्ये जुहूमधील सी-फेसिंगचे घर विकत घेतले होते. या घरात त्याने अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या. २०१५ मध्ये लग्न झाल्यानंतर तो मीराला घेऊन याच घरात आला. मिशाचा जन्मही याच घरात झाला. त्यामुळे या घराने शाहिदला भरभरुन दिले, असेच म्हणावे लागेल. शाहिद वांद्रे येथे जे घर बघत आहे तिथल्या घरांच्या किंमती या साधारणपणे १.४ लाख प्रती चौरस फुटापर्यंत आहेत. त्यामुळे जर शाहिदने २००० चौरस फुटांचे घर जरी घेतले तर त्याची किंमत साधारणपणे २८ कोटींपर्यंत असेल. त्यामुळे शाहिदचे हे नवे घर असणार तरी कसे हे लवकरच कळेल.

दरम्यान, शाहिदच्या आगामी सिनेमांत संजय लीला भन्साळी यांचा ऐतिहासिक सिनेमा ‘पद्मावती’ हा महत्त्वपूर्ण सिनेमा आहे. या सिनेमात शाहिदसोबत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याही मुख्य भूमिका आहेत.