scorecardresearch

आतापर्यंत अशी भूमिका कधीच केली नाही- किंग शाहरुख

शाहरुखला स्वतःला हा प्रोजेक्ट कठीण असल्याचे वाटते

shahrukh khan,शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. बॉलिवूडच्या बादशहाला कोणतीही भूमिका करणं तसं कठीण नसेलच. पण आनंद राय याचा आगामी सिनेमा मात्र याला अपवाद ठरणार आहे. शाहरुखला स्वतःला हा प्रोजेक्ट कठीण असल्याचे वाटते. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा… या सिनेमात तो पहिल्यांदाच बुटक्याची भूमिका साकारणार आहे.

यावेळी शाहरुख म्हणाला की, ‘मी आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमात आगळी वेगळी भूमिका साकारतोय. या सिनेमात व्हीएफएक्सची खरी कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी साधारण ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे’. यावर्षीच्या सुरुवातीला शाहरुखच्या ‘फॅन’ या सिनेमात व्हीएफएक्सची कमाल पाहायला मिळाली होती. याशिवाय याआधी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘रा-वन’ या सिनेमातही व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

शाहरुख म्हणाला, ‘फॅन’च्या शूटिंग दरम्यान गौरवच्या भूमिकेसाठी मला बराच मेकअप करावा लागत होता. हे काम माझ्यासाठी फारच कठीण होते. दोघांची अंग काठी, बोलण्याची पद्धत, हावभाव सर्व काही वेगवेगळे होते.’ फॅन सिनेमात शाहरुखने दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. एकीकडे तो सुपरस्टार होता तर दुसऱ्या भूमिकेत तो एक कट्टर चाहता दाखवण्यात आला होता. आनंद एल. रायच्या आगामी सिनेमात शाहरुख एका ‘बुटक्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणूनचा शाहरुखला या सिनेमात काम करणं कठीण वाटत आहे.

या सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून याआधी कंगना रणौतच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र आता कतरिना कैफच्या नावाची चर्चा सुरू आहे. आनंद यांना ‘तनू वेड्स मनू’च्यावेळी कंगनाचे नखरे सहन करावे लागले होते. यामुळे यावेळी कतरिनाच्या नावाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिनाने या प्रोजेक्टसाठी आपली संमती दिली असल्याचे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-11-2016 at 20:29 IST
ताज्या बातम्या