गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील यशापेक्षा अपयशाचं प्रमाण अधिक दिसून येत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जगभरात १८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठं यश मिळवलं. मात्र, त्यानंतर प्रदर्शित झालेल्या कोणत्याही भारतीय चित्रपटाला त्या कमाईच्या निम्माही टप्पा गाठता आलेला नाही. असं असतानाही दर महिन्याला अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर निर्माते शैलेंद्र सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टच्या ‘अल्फा’ चित्रपटाची तुलना गुजराती चित्रपट ‘लालो’ आणि मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २’ यांच्याशी केली. त्यांचा दावा आहे की, कमी बजेटमध्ये बनलेल्या या प्रादेशिक चित्रपटांनी ‘अल्फा’पेक्षा चांगली कामगिरी केली.
बिग बजेट अल्फापेक्षा प्रादेशिक चित्रपटांची कमाई अधिक
सायरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत शैलेंद्र सिंह म्हणाले की, बॉलिवूडमधील फ्लॉप चित्रपटांचं प्रमाण तब्बल ९४ टक्के आहे. कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटात आहे, यापेक्षा कथा महत्त्वाची असते, असं त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी दावा केला की, गुजराती चित्रपट ‘लालो’ने १४० कोटी रुपयांची कमाई केली, तर मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २’ने ९० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला. दुसरीकडे, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ला ५० कोटी रुपयांचाही टप्पा गाठता आला नाही.
शैलेंद्र सिंह काय म्हणाले?
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ चित्रपटाने भारतात ५८.६० कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरातील त्याची एकूण कमाई १०० कोटी रुपयांचाही टप्पा ओलांडू शकली नाही. दुसरीकडे, ‘लालो’ हा गुजराती चित्रपट केवळ १.२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२० कोटी रुपयांची कमाई करत बजेटच्या ९,९०० टक्क्यांहून अधिक नफा कमावला. तसेच, ‘देऊळ बंद २’ हा मराठी चित्रपट सुमारे ८ ते १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर १२० कोटी रुपयांची कमाई केली.
याबाबत बोलताना शैलेंद्र सिंह म्हणाले, “चित्रपटाची कथा योग्य असली पाहिजे आणि मांडणीही प्रभावी असली पाहिजे.” पुढे ते म्हणाले, “मला दीपिका पदुकोण एखाद्या आक्रमक सूड घेणाऱ्या भूमिकेत सहज कल्पना करता येते. तसेच, पूर्वीच्या काळातील माधुरी दीक्षितलाही वेगळ्या पद्धतीच्या अशा भूमिकेत पाहता आलं असतं. सूड घेण्यासाठी नेहमी तलवार किंवा बंदूकच लागते असं नाही. महिला खूप सक्षम असतात. हिंसा ही नेहमी शारीरिकच असावी असं नाही, ती मानसिक स्वरूपाचीही असू शकते.”
‘अल्फा’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली, जी आतापर्यंतच्या YRF स्पाय युनिव्हर्समधील कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत सर्वात कमी ठरली. पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत किंचित वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर मोठी घसरण झाली. चित्रपटाला समीक्षकांकडूनही फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. व्हायआरएफने अद्याप ‘अल्फा’च्या बजेटची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, चित्रपटात आलिया भट्ट, बॉबी देओल, अनिल कपूर आणि विशेष भूमिकेत हृतिक रोशन यांसारखे मोठे कलाकार असल्याने हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
