Shakti Mohan on Marriage and Kids: शक्ती मोहन ही तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ‘डान्स इंडिया डान्स’च्या दुसऱ्या पर्वाची विजेती ठरल्यानंतर शक्ती मोहनला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. कोरिओग्राफीबरोबरच ती डान्स रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणूनही चाहत्यांच्या भेटीला येते. तसेच तिचा स्वत:चा डान्स स्टुडिओ आहे.

आता तिने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत आली आहे. चाळिशीतही ती लग्न करण्याचा विचार करत नाही आणि तिला तिची मुले नको आहेत, असे तिने सांगितले. तसेच, तिच्या आधीच्या रिलेशनशिपबद्दलही ती बोलली आहे. त्या रिलेशनशिपमध्ये तिची फसवणूक झाली होती, त्यामुळे तिला धक्का बसला होता.

शक्ती मोहनने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. ती म्हणाली, “अनेकजण मला लग्नाबद्दल विचारतात. काल मला माझ्या वडिलांनी विचारले की तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? माझ्या आईला वाटते की कमीत कमी माझा बॉयफ्रेंड तरी असावा.”

“मला माझी मुले असावीत असे मला…”

पुढे ती म्हणाली, “मला माझे काम करताना आणि माझा स्टुडिओ चालवताना मजा येतेय. माझ्या आयुष्यात काही कमी आहे असे मला वाटत नाही. तुमच्या आयुष्यात कोणीतरी असायला हवे, ही समाजाची विचारसरणी आहे. आता ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात गोष्टी सुरू आहेत, त्यासाठी मी आनंदी आहे. त्यात कोणतीच समस्या नाही. जर मला कोणी चांगली व्यक्ती भेटली, तर मी नाही म्हणणार नाही. पण, जर कोणी नसेलच तर मी त्याचा का विचार करू?”

याच मुलाखतीत तिला विचारले की ती सिंगल आहे का? यावर होकार देत लग्नाबद्दल तिचे मत काय आहे, हेही तिने स्पष्टपणे सांगितले. ती म्हणाली, “लग्न करावे असे मला वाटत नाही, मी खूप चांगली मावशी आहे, माझ्या भाच्यांसाठी सर्वोत्तम व्यक्ती आहे. पण, तरीही मी आई व्हावे किंवा मला माझी मुले असावीत असे मला वाटत नाही, मला माझी मुले नको आहेत.”

“जर मुले अशी असतील तर मला ती माझ्या…”

भूतकाळातील तिच्या रिलेशनशिपबद्दल ती म्हणाली, “जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा माझी फसवणूक करण्यात आली होती. जेव्हा मला त्याबद्दल समजले तेव्हा मी लगेचच ब्रेकअप केले, पण माझी आई मला म्हणाली होती की तो चांगला मुलगा आहे. आम्ही तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. मला त्या नात्यातून बाहेर पडावे लागले. माझी आई मला त्यावेळी म्हणाली होती की, मुले अशीच असतात तू ते स्वीकार. पण मी तिला म्हणाले होते की, ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात स्वीकारणार नाही. जर मुले अशी असतील तर मला ती माझ्या आयुष्यात नकोत.”

पुढे ती म्हणाली, “मी अनेक महिने रडत होते, ते माझी आई बघत होती. फसवणूक हा प्रकार मला माहीत नव्हता. जेव्हा कोणी तुमची फसवणूक करते, तेव्हा तुम्ही ते विसरू शकत नाही आणि तुम्ही सगळ्यांवर संशय घेता. माझा जो जोडीदार होता त्याला मी फसवणूक करताना पकडले होते. जेव्हा मी त्याला त्याबद्दल विचारले, तेव्हा तो नकार देत राहिला. त्यानंतर तो अनेकदा माफी मागण्यासाठी घरी आला, पण मी त्याला माफ केले नाही”, असे म्हणत शक्तीने तिला आलेला अनुभव सांगितला.

दरम्यान, शक्ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या डान्स व्हिडीओंना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.