शाल्मली खोलगडे अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते. लोकप्रिय गायिका तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळेही अनेकांच्या चर्चेचा विषय बनली होती. त्याबद्दलही अनेकदा स्पष्टपणे तिने मतं मांडली आहेत. आता शाल्मलीने आंतरधर्मीय लग्न करताना खूप विचार केला होता का आणि आई-वडिलांची प्रतिक्रिया तसेच लग्नानंतरचं आयुष्य, एकमेकांच्या धर्माप्रती असलेला आदर आणि एकमेकांच्या संस्कृतीतील सणवार साजरे करणं याबद्दल भाष्य करत तिच्यापेक्षा तिचा नवरा जास्त गणेश चतुर्थीसाठी उत्सुक असतो असं म्हटलं आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शाल्मलीला आंतरधर्मीय लग्न करणं सोप होतं का आणि अशावेळी खूप बाजूने विचार केला जातो असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “खूप बाजूने नाही आम्ही फक्त माझ्या आणि त्याच्या अशा दोनच बाजूने विचार केला. आम्ही खूप भाग्यवान होतो की त्याच्या आणि माझ्या कुटुंबाचं आंतरधर्मीय लग्नाबद्दल एकच मत होतं. माझ्या आई-वडिलांसाठी माणूस कसा आहे हेच महत्त्वाचं होतं. वेगवेगळ्या परिस्थितीत तो कसा वागेल हे त्यांनी पाच वर्षात पाहिलं. म्हणून त्यांना कळलं की आम्ही लग्न का केलं.”

तो जास्त आनंदाने गणेश चतुर्थी साजरी करतो – नवऱ्याबद्दल शाल्मलीची प्रतिक्रिया

शाल्मली आंतरधर्मीय लग्नाबद्दल पुढे म्हणाली, “खरं सांगायचं तर मी आयुष्याच्या चार गोष्टी त्याच्या धर्मामुळे शिकलीये आणि तो चार गोष्टी माझ्या धर्मामुळे शिकलीये. तो स्वत: गणेश चतुर्थी माझ्यापेक्षा जास्त साजरी करतो. मी कधी कधी घरीच बसलेली असते. पण तो दरवर्षी त्याच्या मित्रांच्या घरी जाऊन दर्शन करुन येतो.”

काही दिवसांपूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत शाल्मली व तिचा नवरा फरहान शेखने त्यांच्या लग्नाबद्दल आणि प्रेमकहाणीबद्दल सांगितलं होतं. मुलाखतीत फरहान म्हणाला, “आमचा एक ग्रुप होता, ज्यात सगळे गायक, संगीतकार असे लोक होते. आम्ही एकमेकांचे मित्र होतो, पण कधी असं डेट वगैरे करायचं किंवा रिलेशनशिपबद्दल विचार केला नव्हता.” शाल्मली पुढे म्हणाली, “काही वेळानंतर आमचं नातं खुलत गेलं. स्टँडअप कॉमेडी आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. त्याने मला कधीच फुलं वगैरे दिली नाहीत आणि मला ते खूप आवडलं, तो खूप साधा होता.”

मुलाखतीत फरहान म्हणाला, “ती एरवी साधे कपडे परिधान करते, पण ती जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा ड्रेस वगैरे घालून यायची. माझ्यासाठी काही पदार्थ बनवायची, मी काहीही बोललो तरी हसायची; तेव्हा मला कळलं होतं की इथे काहीतरी वेगळं आहे.” शाल्मली पुढे म्हणाली, “आमची पहिली डेट पण फार वेगळी होती. आम्ही कोविडमध्ये एकत्र राहत होतो. जेव्हा दिवस रात्र तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर असता तेव्हाच मला जाणवलेलं की हीच ती व्यक्ती आहे.”

शाल्मलीने फरहान शेखबरोबर साध्या पद्धतीने केलेलं लग्न

शाल्मलीने संगीतकार फरहान शेखसह २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. शाल्मलीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यापेक्षा तिचा नवरा तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न पाहतो असं म्हटलं आहे.