नाटककार सतीश आळेकर यांची बहुतेक नाटकं मानवी दु:ख, वेदना, माणसाचं जगणं यांकडे तिरकस दृष्टीनं पाहणारी असतात. कृष्ण-सुखात्मिका हा त्यांचा आवडता खेळ. लेखकाचा एकूणच जगण्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे की काय असं वाटावं इतपत त्यांच्या नाटकांवर ही छाया दिसते… जाणवते. खरं तर त्यांचं प्रत्यक्षातलं बोलणं, वागणंही त्याच प्रकारे होताना दिसतं. त्यांचं ‘शनिवार रविवार’ हे नाटकही याचाच प्रत्यय देतं. एका अपत्यहीन जोडप्याची ही गोष्ट आहे. अपत्याशिवाय त्यांचं आयुष्य शुष्क झालेलं आहे.
आला दिवस काहीच वेगळं न घडता मावळतो. त्यानं त्यांच्या आयुष्यात एक भलामोठ्ठा कंटाळा भरून राहिलाय. ईश्वर बँकेतही त्याच त्या रूटिनला वैतागलाय. तर घरी स्वैपाक आणि वाचनाशिवाय करायला काही नाही म्हणून सुमन बोअर झालीय. मूल होण्यासाठीचे सारे उपाय, उपचार करून झालेयत. परंंतु कशाचाच काही उपयोग झालेला नाही. बरं, मूल आपल्याच रक्तामांसाचं हवं, हा सुमनचा अनावर हट्ट. तो ती सोडायला कदापि तयार नाही. नाही तर ईश्वरला मूल दत्तक घेणंही चाललं असतं. अशात त्यांचं वय उलटून चाललंय, पण गर्भसंभवाचा पत्ता नाही. करायचं काय? ती दोघं घायकुतीला आलीयत.
सुट्टीचे शनिवार-रविवार काटणं तर ईश्वरच्या अक्षरश: जीवावरच येतात. बेकार… भाकड, अंतहीन दिवस. पण मग अचानक काहीतरी घडतं. ईश्वरला कुणा स्त्रीचे फोन यायला लागतात. ते घेताना ईश्वर बावरल्यासारखा होतो… आणि मग सुमनला ईश्वरबद्दल संशय दाटून यायला लागतो. त्याचं कुणाशीतरी लफडं सुरू आहे अशी शंका तिला येते. या अज्ञात स्त्रीचे फोन घेताना ईश्वरला कसंनुसंच होतं. त्यावरून तिने तर्क बांधलाय की, ईश्वर बाहेर कुणात तरी गुंतलाय. ती त्याला त्याबद्दल खोदून खोदून विचारते, पण तो ताकास तूर लागू देत नाही. त्यामुळे तिचा संशय अधिकाधिक पक्का होत जातो.
अशात अचानक एका शनिवारी रात्री एक अनोळखी गृहस्थ त्यांच्या घरी अवतरतात. आपलं नाव ‘गंमत’ असल्याचं सांगून आपण सुमनच्या कॉलेजमधल्या वह्या परत करायला आल्याचं तो सांगतो. सुमन आधी त्याला साफ झिडकारतेच. कोण तू? कशाला आलायस? वगैरे विचारून ती त्याला भंडावून सोडते. तो २४ वर्षांपूर्वीची कॉलेजात जाणारी सुमन मनात ठेवून आलेला असतो! पण तिला त्यावेळचं काही म्हटल्या काही आठवत नाही. गंमत तिला निरनिराळे संदर्भ देत राहतो. त्यातून मग हळूहळू काही धागेदोरे जुळू लागतात… आणि सुमनला त्याची ओळख पटते. पण यामुळे ईश्वरला सुमनच्या लग्नाआधीच्या भानगडीची खबर मिळते आणि तो आपली फसवणूक झाली म्हणून सुमनवर चिडतो. आपल्यावर संशय घेणार्या सुमनचीच काहीतरी भानगड आहे हे कळल्यानं त्याच्या हातात आयतंच कोलीत मिळतं. सुमन त्याला तसं काहीही नाहीए हे सांगायचा खूप प्रयत्न करते. पण व्यर्थ!
अशातच ईश्वरला सतत फोन करणारी स्त्री अचानक त्यांच्या घरी येऊन टपकते. ती बबी असते. सुमनची कॉलेजमधली मैत्रीण. तीच कर्जासाठी ईश्वरला सतत फोन करत असते. आणि आता त्याला भेटायला त्याच्या घरी आलेली असते. तिला पाहून ईश्वरला धक्का बसतो. कारण तो आता सुमनपुढे उघडा पडणार असतो ना!
पण…
पण घडतं भलतंच!
नाटककार सतीश आळेकर यांनी अपत्यहीन दाम्पत्याचं कळाहीन जीवन, त्यातले ताणतणाव आणि त्यातून त्यांचं जीवन नीरस होत जाणं यात दाखवलं आहे. अर्थात त्यांना कुठंही ‘बिच्चारं’ न करता! यावर एक उपाय शोधला जातो… इल्युजनमध्ये राहण्याचा! ईश्वर आणि सुमन तेच करतात. आयुष्यातल्या समस्येकडे पाठ फिरवून भलत्याच गुंत्यात अडकत जातात. त्यानं त्यांचं मन काही काळ त्यात गुंतून राहतं. तो गुंता सोडवता सोडवता मूळ मुद्द्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि तेवढंच त्यांना बरं वाटतं.
हा भास-आभासाचा खेळ त्यांच्या आयुष्यात काही तणावपूर्ण क्षण आणतो खरा, पण तेवढीच त्यांची अपत्यहीनतेच्या दु:खातून सुटका होते. लेखक सतीश आळेकर यांनी मानवी दु:खातून निसटण्याचा हा पलायनवादी विचार या नाटकातून मांडला आहे खरा; पण तो माणसाच्या आयुष्यातील संकटांचा सामना करताना काहींना दिलासादायकही वाटूच शकतो. इथे प्रशांत दळवी यांच्या ‘‘ध्यानीमनी’नाटकाची आठवण होते. व्यक्तिरेखाटनापेक्षा घटना-प्रसंगांवर जास्त भर या नाटकात दिला गेला आहे. आयुष्यातलं कंटाळवाणेपण आणि त्यातून बाहेर पडण्याची माणसाची धडपड यात जाणवते.
दिग्दर्शक, नेपथ्य आणि प्रकाशयोजनाकार केदार सामंत यांनी यातल्या आशयावर जोर दिला आहे. त्याकरता पात्रांचं वागणं-बोलणं, हावभाव, त्यांतून ध्वनित होर्णा या भावभावना, त्यांचं विरेचन यावर त्यांचा भर जाणवतो. विरंगुळ्यासाठी त्यांनी लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा आधार घेतला आहे. अर्थात आशयाला सुसंवादी अशाच. (पार्श्वसंगीत : निलेश जोशी) नेपथ्यात मुद्दाम उल्लेख करण्यासारखं काही नाही. प्रकाशयोजनाही ठीक. शमा वैद्य-नाईक यांनी पात्रांची रंगभूषा आणि वेशभूषा वास्तवदर्शीत्वानं केली आहे. नृत्यही ठीक.
यातल्या कलाकारांनी मात्र खूप मनापासून कामं केली आहेत. वर्षा वैद्य यांनी सुमनचं बोअरिंग आयुष्य, तिची अपत्याबद्दलची असोशी, नवर्याच्या बाहेरच्या प्रकरणाची भणक लागल्याने अस्वस्थ झालेली स्त्री, गंमतच्या येण्याने तिच्या नीरस जीवनात आलेली गंमत ही अवस्थांतरं त्यांंनी छान दाखवली आहेत. डॉ. संजीव आकेरकर यांचा ईश्वर सरळमार्गी, पण बबीच्या त्याच्या जीवनात येण्याने बेचैन झालेला, सुमनच्या टुमण्याने भित्र्या सशासारखी अवस्था झालेला आणि गंमतमुळे सुमनविरोधात आपल्याकडेही एक शस्त्र आल्याने काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकणारा नवरा यथार्थ वाटतो. गंमतचे तोतरेपण आणि कविता म्हणताना ते अदृश्य होणं याचा ताळमेळ डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी अचूक साधला आहे. सुमनच्या जुन्या आठवणींत रमणारा आणि इतक्या वर्षांनीही त्या गोंजारत बसणारा गंमत त्याच्या गंमतशीर वागण्या-बोलण्यातून त्यांनी मूर्त केला आहे. बबीचं उत्साही व्यक्तिमत्त्व डॉ. चेतना चुबे यांनी नीटस पकडलंय. एकुणात आळेकरी नाटकाच्या वानवळ्याचा प्रत्यय देणारं हे नाटक आहे.
