शंकर-एहसान-लॉय या संगीतकारांच्या त्रिकूटाने गजेन्द्र अहिरे यांच्या ‘अनवट’ चित्रपटास संगीत दिले आहे. ‘अनवट’ चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अमानवीय शक्तिंवर आधारित या थरारपटाचा पुढील महिन्यात होणाऱ्या ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवात’ प्रिमियर ठेवण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना गजेन्द्र अहिरे म्हणाले, शंकर-एहसान-लॉय यांना चित्रपटाच्या संगीतासाठी सामावून घेणे तितकेसे कठीण नव्हते, खरंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता हे काम केले आहे. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील अनेक प्रसिद्ध मराठी गाणी पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर महादेवन या जोडीने दिली आहेत. या दोघांविषयी बोलताना गजेन्द्र अहिरे म्हणाले, जेव्हा मी शंकर महादेवनबाबत पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी चर्चा केली, तेव्हा या चित्रपटातील एक गाणे शंकर महादेवनच्या खूप जवळचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण, गोवा आणि हैदराबादेत चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटात १९७५चा काळ दर्शविण्यात आला आहे.