मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षेंना ओळखले जाते. ते कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते कायम विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. शरद पोंक्षे यांना कट्टर सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायम त्यांचे विचार सोशल मीडियाद्वारे मांडताना दिसतात. मात्र यामुळे त्यांना अनेकदा टीका सहन करावी लागते. नुकतंच या सर्व टीकांवर त्यांच्या लेकीने थेट भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पोंक्षे हे विद्यार्थीदशेमध्ये असल्यापासूनच नाटकांमध्ये काम करत आहेत. मराठी रंगभूमीवर नाव कमावल्यानंतर त्यांनी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘अग्निहोत्र’, ‘वादळवाट’ अशा काही अजरामर मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्येही काम केले आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी ही वैमानिक आहे. नुकतंच तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी तिने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

‘तुझे वडील अनेक कार्यक्रमांमध्ये भाषणांमधून त्यांचे विचार सर्वांसमोर प्रकट करत असतात. त्यावरुन अनेकदा त्यांना टीका सहन करावी लागते. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल देखील केलं जातं, याबद्दल तुला काय वाटतं?’ असं सिद्धीला विचारलं असता ती म्हणाली, “मला माझ्या बाबांचा आणि त्यांचा विचारांचा मला कायमच अभिमान वाटतो.”

“कारण शाळेत आमच्या नवीन पिढीला जो इतिहास शिकवला जातो, तो खूप मर्यादित आहे. पण इतिहासातील अशा अनेक गोष्टी, अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. ही माहिती देण्याचं काम बाबा करत आहेत. जेव्हापासून मला या गोष्टी समजू लागल्या. तेव्हा मी त्यांना याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या सर्व शंकाचे योग्य पद्धतीने मला समजतील असे निरसन केले होते.

बाबांमुळे आमच्यासारख्या नवीन पिढीला काळाच्या पडद्याआड दडलेल्या इतिहासातील अनेक गोष्टी माहिती होत आहेत. आज माझे अनेक मित्र- मैत्रिणी बाबांच्या पोस्ट आवर्जून वाचतात. त्या वाचल्यानंतर नवी माहिती मिळत असल्याचं सांगतात, असेही सिद्धीने सांगितले.

आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

“बाबांच्या या विचारसरणीमुळे अनेकदा त्यांना धमक्या मिळतात. कधी फोनवरून तर कधी सोशल मीडियावरुन त्यांना धमकावले जाते. सुरुवातीला आम्हाला त्याची भीती वाटायची. पण बाबा आम्हाला काहीही होऊ देणार नाही, याची आम्हाला खात्री होती. ते आमच्यामागे खंबीरपणे उभे असतील, असा विश्वास कायमच असतो”, असेही शरद पोंक्षेंची लेक सिद्धीने म्हटले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe daughter siddhi ponkshe talk about fathers trolling after post nrp
First published on: 29-11-2022 at 12:01 IST