रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनाआधीच त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा समाचार घेतला होता. आता त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पोंक्षे यांनी आपल्या ट्वीटमधून दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एका मागोमाग एक ३-४ ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पोंक्षे यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “आज अनेक आमच्यासारख्या कलावंतांना पोरकं करुन गेला. त्यांचे काम बघून कॉपी करून अनेक नट तयार झाले. त्या सगळ्यांना पोरकं करून गेला. तुझ्या आत्म्याला शांती लाभू दे. भावपूर्ण श्रध्दांजली विक्रम काका.”

आणखी वाचा- “माहेरची साडी चित्रपटावेळी आम्ही…” अलका कुबल यांनी सांगितली विक्रम गोखलेंची आठवण

याशिवाय शरद पोंक्षे यांनी आपल्या ट्विटरवर आणखी काही ट्वीट्स केले आहेत. त्यांनी आपल्या पुढच्या एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे, “ह्या नाट्य चित्रपट अशा खोट्या जगात जी काही खरी माणसं मला मिळाली त्यातल एक मोठं नाव “ विक्रम गोखले” माझे गुरू विक्रम काका. जिवंत व सहज अभिनय कसा करावा हे आमच्या सारख्या अनेक पिढ्यांना नकळतपणे शिकवणारा गुरू. पॉज कसा घ्यावा व किती समर्थपणे घ्यावा हे फक्त त्यांनाच जमलं. रंगभूमीवरचा व पडद्यावरील देखणा अभिनेता. देखणे अनेक आहेत पण देखणेपणाबरोबर तितकच देखणं काम करणारा अभिनेता. सुसंस्कृत, नितीमत्ता जपणारा. रसिकांसमोर व पडद्यामागे कसं वागावं बोलावं हे त्यांच्याकडून शिकावं. प्रखर हिंदूत्ववाद मांडणारा, त्यामुळे अनेक विवादात सापडणारा, तरीही न डगमगता ठामपणे आपली भूमिका मांडणारा विक्रम काका. शेवटच्या क्षणापर्यंत देश, सैनिकांसाठी काम करणारा विक्रम काका, सतत एकेरी उल्लेख करतोय कारण आमचं नातच तसं होतं. ते मुलासारखं मानायचे मला. मीही ए काकाच म्हणायचो. असंख्य नाटक सिनेमा मालिकेतून एकत्र कामं केलेयत आम्ही.”

त्याआधी ‘झी २४ तास’शी बोलताना शरद पोंक्षे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनाआधीच त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले होते, “विक्रम गोखले हे आमच्या सगळ्या पिढ्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही सगळेजण अभिनय शिकलो. गेले ४ दिवस त्यांच्या मृत्यूच्या बातमीचा सोशल मीडिया आणि मीडियाने सगळा खेळखंडोबा केला होता. काहीही पुरावा हातात नसताना सगळे श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. ज्यांनी या घाणेरड्या शब्दांत श्रद्धांजली वाहिली असेल त्यांचा जीव आज शांत झाला असेल. त्या सगळ्यांचा मी सर्वप्रथम तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि मग हे दुःख व्यक्त करतो. आमचे काका गेले, आमचा गुरु गेला, आमचा पाठीराखा गेला. आमच्या पिढीला पोरकं करून गेले विक्रम गोखले. खूप आशा काल संध्याकाळी निर्माण झाली होती. ते परत उभे राहतील, काम करतील, परत बोलतील आमच्याशी पण, ही बातमी ऐकून मी अक्षरशः हादरुन गेलो आहे. परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती दे आणि त्यांच्या कुटुंबाला सावर.”

आणखी वाचा-“आधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं होतं. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe emotional tweet after vikram gokhale death mrj
First published on: 27-11-2022 at 09:38 IST