scorecardresearch

ऋषी कपूर यांचे शर्माजी.. आणि त्यांचे कुटुंब

दोन वर्षांपूर्वी करोनाचा कहर सुरू झाला. मार्च महिन्यात सिनेमागृहे, चित्रीकरण सगळेच बंद झाले आणि त्याच एप्रिलमध्ये पहिल्यांदा इरफान खान आणि मग ऋषी कपूर यांच्या निधनाच्या घटना लागोपाठ घडल्या.

दोन वर्षांपूर्वी करोनाचा कहर सुरू झाला. मार्च महिन्यात सिनेमागृहे, चित्रीकरण सगळेच बंद झाले आणि त्याच एप्रिलमध्ये पहिल्यांदा इरफान खान आणि मग ऋषी कपूर यांच्या निधनाच्या घटना लागोपाठ घडल्या. ३० एप्रिलला कर्करोगाशी झुंज देणाऱ्या ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची भूमिका असलेला ‘शर्माजी नमकीन’ हा अखेरचा चित्रपट गेल्या आठवडय़ात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ऋषी कपूर यांचे काम पाहून एकीकडे चाहत्यांचे कौतुकाचे शब्द थांबत नाही आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटावरून एक वेगळाच कौटुंबिक अध्यायही रंगला आहे.

ऋषी कपूर यांना कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात खरोखरच काही वेगळय़ा, त्यांनी आजवर केल्या नसतील अशा भूमिकांमधून पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळाली होती. खास ऋषी यांना डोळय़ासमोर ठेवून काही भूमिका लिहिल्या गेल्या होत्या वा चित्रपटांसाठी त्यांची निवड केली गेली होती. यात ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट होता. तसेच ‘द इंटर्न’ या प्रसिध्द हॉलीवूडपटाच्या रिमेकसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऋषी कपूर यांची निवड करण्यात आली होती. तशी अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. प्रत्यक्षात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यास अवकाश होता. त्याआधीच ऋषी यांचे निधन झाले. आता त्यांच्या जागी महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘शर्माजी नमकीन’ची गोष्ट मात्र वेगळी होती. ऋषी कपूर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांचे जे चित्रपट रखडले त्यात या चित्रपटाचाही समावेश होता. स्वत: ऋषी यांना हा चित्रपट पूर्ण करायची इच्छा होती, अशी माहिती त्यांचा मुलगा, अभिनेता रणबीर कपूर याने माध्यमांना दिली. हितेश भाटिया आणि सुप्रतीक सेन या नव्या जोडगोळीची कथा असलेल्या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर याने केली होती. या चित्रपटाचे अध्र्याअधिक चित्रीकरण झाल्यानंतर ऋषी कपूर यांचे निधन झाले आणि चित्रपट रखडला.

निवृत्तीनंतर एकटय़ा पडलेल्या वयोवृध्दाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनीच केले होते. मध्यमवर्गीय, काहीशी तिखट-गोड, मिश्कील व्यक्तिरेखा साकारण्यात ऋषी कपूर यांचा हातखंडा होता. प्रेक्षकांनाही त्यांना अशा भूमिकेत पाहणे आवडत होते. त्यामुळे त्यांची भूमिका असलेला हा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. अभिनेते परेश रावल यांनी ऋषी यांची राहिलेली भूमिका पूर्ण करण्याची तयारी दाखवली आणि चित्रपट पूर्ण झाला. या चित्रपटाचा विशेष शो कपूर कुटुंबीयांना दाखवण्यात आला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपले काका रणधीर कपूर इतके हळवे झाले की त्यांनी आपल्याला ऋषी यांच्याशी बोलायचे आहे, त्यांना फोन करण्याची विनंती केली, असे रणबीरने सांगितले. एकीकडे या चित्रपटातील ऋषी कपूर यांची भूमिकाच इतकी अप्रतिम होती की काकांना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही, असे सांगतानाच आपले काका स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती रणबीरने माध्यमांना दिली. ऋषी आणि राजीव या दोन्ही भावंडांच्या मृत्यूनंतर रणधीर अधिक खचले असल्याचे सांगितले जाते. त्यात हा चित्रपट पाहिल्यानंतर ऋषी कपूर या जगात नाहीत, हेच त्यांना लक्षात आले नाही. आजारपणामुळे असे झाले असल्याची माहिती रणबीरने दिली. दुसरीकडे खुद्द रणधीर कपूर यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत चाहत्यांना आणखी गोंधळात टाकले आहे.

मला काहीही झालेले नाही..

स्मृतिभ्रंशाचा आजार आणि ऋषी कपूर यांच्या चित्रपटाच्या वेळी घडलेली घटना याविषयी माध्यमांनी थेट रणधीर यांनाच विचारणा केली तेव्हा त्यांनी आपल्याला कोणताही आजार झालेला नाही, असे स्पष्ट केले. आपण नुकतेच गोव्याला सुट्टीसाठी जाऊन आलो आहोत. मला काहीही झालेले नाही, हे सांगणाऱ्या रणधीर यांना रणबीरने असे का सांगितले?, याबद्दलही माध्यमांनी विचारणा केली. त्यावर तो त्याला वाटेल ते काहीही सांगू शकतो.. असे सांगत या प्रश्नाला बगल दिली. एकंदरीतच ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटाच्या निमित्ताने कपूर कुटुंबीयांमध्ये विनाकारण घडलेला हा वाद वा गोंधळ चाहत्यांसाठी तरी अनाकलनीय ठरला आहे. या सगळय़ात न पडता अनेकांनी आपल्या आवडत्या कलाकाराच्या या अखेरच्या अदाकारीचे भरभरून कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharmaji rishi kapoor family corona theaters filming irfan kapoor death incident cancer struggle ysh