बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधननानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला. अनेकांनी चित्रपट निर्माता करण जोहरवर निशाणा साधत त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी करण जोहरला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.
हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार शत्रूघ्न सिन्हा यांनी सुशांतच्या आत्महत्येवर वक्तव्य केले आहे. ‘सुशांत एक यशस्वी अभिनेता होता. या इंडस्ट्रीमध्ये बाहेरुन आलेल्या कलाकारांचे स्वागत केले जाते. मग ते बिहार, उत्तर प्रदेश कुठूनही येऊ देत. कोणासोबतही येथे भेदभाव केला जात नाही’ असे शत्रूघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.
‘करण जोहरला अनावश्यकपणे टारगेट करण्यात आले आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडिल उद्योगपती आहेत. त्याचा फिल्मी बॅकग्राऊंड नाही. तसेच आलिया भट्ट करण जोहरची नातेवाईक नाही. मग यामध्ये घराणेशाही वाद कुठून आला? आता या वादावर बोलण्याची वेळ आली आहे. तसेच आयुषमान खुरानाच्या घरातील कोणीही इंडस्ट्रीमधील नाही. आयुषमाननंतर त्याचा भाऊ अपारशक्ती खुरानाने करिअरला सुरुवात केली’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरवर जोरदार टीका झाली. या सर्व वादामुळे करण जोहर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया पासून लांब आहे. त्याने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले असून काही निवडक लोकांनाच तो फॉलो करत असल्याचे दिसत आहे. तसेच करणने MAMI (मुंबई फिल्म फेस्टिव्हल) च्या बोर्डवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.