Shekhar Suman on PM Modi Political Jokes: अभिनेते शेखर सुमन यांच्या यूट्यूबवरील ‘शेखर टुनाईट’ या शोला चांगली प्रसिद्धी मिळाली. शेखर सुमन यांचे खुमासदार विनोद, प्रस्थापितांविरोधात बोलण्याची त्यांची बेधडक आणि सृजनशील शैली अनेकांना पसंत पडली. मात्र त्याचवेळी सरकारविरोधी सूर असल्यामुळे त्यांच्यावर संकट ओढवू शकते, असे बोलले जात होते. या शोचे निर्माते धर्मेश संगानी यांच्यावर ईडीची धाड पडल्याची माहिती समोर आली होती. यावर आता शेखर सुमन यांनी भाष्य केले आहे. तसेच आपल्या शोमधून भाजपाविरोधी विनोद होत असल्याच्या आरोपावरही त्यांनी भूमिका विशद केली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधीबाबतची मतेही त्यांनी व्यक्त केली.

निर्माते धर्मेश संगानी यांच्यावरील ईडीची धाड आणि शेखर टुनाईट या शोचा काहीही संबंध नसल्याचे शेखर सुमन यांनी पहिल्यांदा स्पष्ट केले. शेखर सुमन आपल्या शोमध्ये पाहुण्याची मुलाखत घेण्यापूर्वी एकपात्री प्रयोग सादर करत असत. एका शोमध्ये त्यांनी ‘हुकूमशहा’ शब्दाचा वापर केला होता. मात्र शेखर सुमन यांनी या शब्दावरून फारसा फरक पडत नसल्याचे सांगितले. एका करमणुकीच्या कार्यक्रमामुळे पंतप्रधान मोदींना फारसा त्रास होणार नाही, असेही ते म्हणाले.

शो कुणाच्याही विरोधात नाही, तर लोकांच्या बाजूने

शेखर टुनाईट हा शो भाजपाविरोधी नसून लोकांच्या बाजूने आहे. लल्लनटॉप या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेखर सुमन यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, जेव्हा वर्गात एखादी चूक होते. तेव्हा मॉनिटरला जबाबदार धरले जाते. त्याचप्रकारचे काम माझ्या शोमधून होते, हे सांगताना ते म्हणाले, १९९७ साली भाजपाचे आणि २०१२ साली काँग्रेसचे सरकार असताना “मूव्हर्स अँड शेकर्स” हा शो चालला होता.

शेखर सुमन पुढे म्हणाले, “माझ्या शोमधून यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही विनोद करण्यात आले होते. आम्ही एका व्यक्तीवर नाही तर सरकारवर बोलत असतो. जर तुम्ही एखाद्याला व्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी निवडले असेल आणि त्याच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही बोट दाखवणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच आम्ही कुणाच्या विरोधात नाही तर लोकांच्या बाजूने आहोत. आम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करत असून त्यांचा आवाज आणखी बळकट करण्याचे काम करतो. उद्या जर इतर कुणी सत्तेत आले तरीही आम्ही हेच करू.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोहोंचाही आपण तेवढाच सन्मान करतो, असेही शेखर सुमन म्हणाले. पण राजकारण्यांचा आदर राखणे म्हणजे त्यांच्या चुकीच्या वागण्यावर शांत बसणे, असे होत नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत…

पंतप्रधान मोदींवर भाष्य करताना शेखर सुमन म्हणाले की, “मला वाटत नाही की, पंतप्रधान मोदी इतके कमकुवत असतील की, एका छोट्याशा शोमुळे त्यांना काही फरक पडेल. ते खूप शक्तीशाली आहेत. जगभरात आणि देशात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत, ज्याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते.” फैज अहमद फैज यांच्या ओळींचे विडंबन करताना शेखर सुमन म्हणाले, “और भी गम है जमाने मै, शेखर टुनाईट के सिवा.”

माझा शो थांबवला जाईल, यात बिलकुल तथ्य नाही, असेही ते म्हणाले. “माझा शो ते का म्हणून थांबवतील? स्वत: पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा सांगतिले आहे की, त्यांना चिकित्सा आणि टीका आवडते. आम्ही त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली आहे. मला वाटते की, त्यांच्यात विनोदबुद्धी आहे आणि ते आमचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेणार नाहीत. हा लोकशाही आणि माझ्या व्यवसायाचा भाग आहे. आम्ही करमणुकीच्या आणि उपहासाच्या चौकटीत राहून काम करतो. त्यामुळे सरकारला चिंता करण्याची काहीही गरज नाही. माझा शो तेवढा महत्त्वाचा नाही”, असेही शेखर सुमन म्हणाले.