बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेहनाज गिलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २ सप्टेंबर रोजी शेहनाज गिलचा जवळचा मित्र आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. शेहनाजला त्याच्या अचानक निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे. परंतु शो मस्ट गो ऑन म्हणत शेहनाज यातून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘हौसला रख’ हा चित्रपट पंजांबी भाषेत येत असून यात पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

‘हौसला रख’ या चित्रपटात शेहनाज आणि दिलजीत हे एक एनआरआय कपलची भूमिका साकारताना दिसतील. कथेनुसार सगळं काही सुरळीत सुरू असते. मात्र, शेहनाज अपघाताने गर्भवती होते आणि मग एका मागोमाग एक प्रॉब्लेम्स येतात. दोघांनाही हे मुल नको असल्याने ते मुलाच्या जन्मापूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज करतात. मग बाळ झाल्यानंतर पुढे ते त्याचा सांभाळ कसा करतात, ते या चित्रपटात दाखवण्यात येत आहे. पंजांबी अभिनेता दिलजीत दोसांजने पंजाबी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप पाडली आहे.

‘हौसला रख’ या चित्रपटाद्वारे दिलजीत निर्माता म्हणून पदार्पण करतोय. हा चित्रपट १५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याला प्रदर्शित होणार आहे. दिलजीत आणि शेहनाजला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट बघताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या हटके कॉन्सेप्टमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.