मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या करिअरमध्ये ज्या भूमिका केल्या, त्यामुळे ती बरेचदा चर्चेत राहिली. शर्लिन चोप्राने प्रस्थापित चौकट मोडून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण अभिनेत्री म्हणून तिचं करिअर फार मोठं नाही. ती बोल्डनेस, रिअ‍ॅलिटी शो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

शर्लिनने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. २००२ मध्ये ‘वेंधम’ या तमिळ चित्रपटातून तिने अभिनयाला सुरुवात केली. बॉलीवूडमध्ये तिने ‘टाइम पास’ (२००५) या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर’, ‘रकीब’, ‘रेड स्वस्तिक’ आणि ‘दिल बोले हडिप्पा!’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या आणि सहाय्यक भूमिका केल्या. शर्लिन चोप्राने ‘कामसूत्र 3D,’ ‘खेल’ आणि ‘चमेली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

शर्लिन चोप्राचं न्यूड फोटोशूट

तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तिचं एक फोटोशूट ठरलं. २०१२ मध्ये ‘Playboy’ मासिकासाठी तिने न्यूड फोटोशूट केलं होतं. असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यानंतर तिची जगभरात चर्चा झाली. मात्र भारतात तिच्यावर खूप टीका झाली. खरं तर तिने इतका बोल्ड निर्णय घेतला, पण त्याचा तिच्या करिअरला विशेष फायदा झाला नाही.

पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली

काही वर्षांपूर्वी शर्लिनने तिच्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता. मुंबईत आल्यावर करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिने पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवल्याचं पोस्टद्वारे सांगितलं होतं. “मला पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंधांसाठी अनेक वेळा विचारण्यात आलं आहे. मी यापूर्वीही पैशांसाठी संबंध ठेवले आहेत. हा खुलासा मी स्वतःची प्रतिमा बिचारी किंवा चांगली वा वाईट करण्यासाठी करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतेय की आजही लोक माझ्याशी शारीरिक संबंधांसाठी संपर्क साधतात, पण मी आता ते करत नाही,” असं शर्लिन चोप्राने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

वादांमुळे चर्चेत राहिली शर्लिन चोप्रा

शर्लिनने टेलिव्हिजनवरही आपले नशीब आजमावले. ती ‘बिग बॉस ३’ (२००९) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिने ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’चे सूत्रसंचालनही केले. अभिनयासोबतच तिला गाण्याचीही आवड आहे. तिचं ‘बॅड गर्ल’ हे गाणंही आलं होतं. गेल्या काही वर्षांत शर्लिन चित्रपट आणि अभिनयापेक्षा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कायदेशीर प्रकरणांमुळे जास्त चर्चेत राहिली आहे. राज कुंद्रा प्रकरण असो किंवा साजिद खानवर केलेले आरोप, तिने नेहमीच स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत.