द. मा. मिरासदार हे उत्तम विनोदी लेखक म्हणून सुपरिचित आहेत. कालौघात ते वाचकांच्या स्मरणातून थोडेसे मागे पडले असले तरी नाटकवाल्यांना स्वतंत्र विषय न मिळाला तर त्यांच्या एखाद्या कथेवर नाटक बेतून स्पर्धेत बाजी मारता येते हे नाटकवाल्यांना बरीक ठाऊक आहे. लग्न आणि तत्सम विषयांच्या चाकोरीत अडकलेल्या अभिनेते प्रशांत दामले यांनाही त्या प्रचलित चाकोरीचा कंटाळा येऊन तेही एक वेगळा विषय म्हणून द. मां.च्या ‘व्यंकूची शिकवणी’ या खुसखुशीत कथेवर आधारित अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित ‘शिकायला गेलो एक!’ हे नवं नाटक घेऊन आले आहेत. फक्त त्यांनी एक केलं आहे, की त्या कथेची वन लाईन घेऊन त्यांनी नाटक आजच्या काळात घडवलं आहे. त्यामुळे द. मां.च्या कथेला समकालीनता लाभली आहे.

महेश साने हे नाकासमोर चालणारे, साधेभोळे, आदर्श शिक्षक. त्याबद्दल त्यांना गौरवान्वित करण्याचा सोहळा संपन्न होत असतानाच कोल्हापूरचे आमदार खराडे हे आपल्या वर्षानुवर्षे दहावीची वारी करर्णा या मुलाला- शामला सानेंची शिकवणी लावून त्याची एकदा नय्या दहावीपार करायचं मनाशी पक्कं ठरवूनच आदर्श शिक्षक असलेल्या महेश सानेंच्या घरी येतात. पण अशा घोडनर्व या, अभ्यासापेक्षा इतर उचापतींतच रस असर्णा या मुलाला आपण काय शिकवणार असा सानेंना प्रश्न पडतो. त्यामुळे ते आमदार खराडेंना साफ नकार देतात. पण खराडे त्यांच्या अक्षरश: खनपटीलाच बसतात. तेव्हा सानेंची मुलगी विद्या त्यांना भरमसाठ फी आणि इतर काही अटी घालते. घायकुतीला आलेले खराडे तत्काळ त्यांच्या या अटी मान्य करतात. शेवटी सानेंचा नाइलाज होतो. ते शामची शिकवणी घेण्याचं मान्य करतात.

Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
do patti
अळणी रंजकता

हेही वाचा >>> नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

पण शामला इतर भरपूरच छंदफंद असल्याने तो त्यांच्याकडे शिकण्यास साफ नकार देतो. आता हे आव्हान कसं पेलायचं हे सानेंसमोर मोठंच आव्हान उभं ठाकतं. ते त्याला आधी बाबापुता करून पाहतात. पण तो त्याला भीक घालत नाही. शेवटी ते त्यालाच विचारतात, की बाबा, तू काय केलं म्हणजे शिकशील? तो म्हणतो, मी सांगेन ते केलंत तर मी तुमच्याकडे शिकीन. ते त्याची अट मान्य करतात. तो त्यांना तंबाखू खायला देतो. ते नाइलाजानं तो खातात. आता त्याला त्यांच्याकडे शिकण्याशिवाय पर्याय उरत नाही. तोही मग नाइलाजानं पुस्तकं हाती घेतो. पण एकेक धडे शिकण्यासाठी तो सानेंना नाना गोष्टी करायला भाग पाडतो. त्यांना दारू, बाई, पब, डेटिंग अॅप वगैरेंचा नाद लावतो. त्यामुळे नेमकं कोण कुणाची शिकवणी घेतोय हेच कळेनासं होतं. आदर्श शिक्षकाचा पार चोळामोळा करून शाम त्याला आपल्या तालावर नाचणारं प्यादं बनवून टाकतो. शिक्षकच विद्यार्थ्याची शिकवणी लावतो जणू.

याचा शेवट काय होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसते. असो.

आपल्या शिक्षणपद्धतीचं, शिक्षक आणि शिक्षणाचं आज जे काही भजं झालंय त्याची झलक यात पाहायला मिळते. त्यात सत्ताधारी, धनदांडगे शिक्षणाची इतकी अवनती करून राहिलेत की ज्याचं नाव ते! या नाटकात विद्यार्थीच शिक्षकाला वेठीला धरत असला तरी आज शिक्षणाचं वाटोळं करण्यात अनेकानेक घटक कारणीभूत आहेत. त्याचा वानगीदाखल वानवळा यात पाह्यला मिळतो. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असं शिक्षकी पेशाबाबत म्हणण्याची पाळी सुज्ञांवर आज आलेली आहे. शिक्षणाबाबत भाष्य करताना द. मां.ची खुमासदार शैली इथं इतकी वाकवण्यात आलीय की अतिशयोक्तीचा कडेलोट व्हावा. त्यातून एक विषण्ण विनोदनिर्मिती होत राहते. मदाऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या अस्वलाची इथं आठवण होते. पण कसं का होईना, या सगळ्या खेेळखंडोबातही शाम त्यांच्याकडून दहावीची शिकवणी घेतो, पासही होतो. बापाचं गंगेत घोडं न्हातं.

लेखक अद्वैत दादरकर यांनी द. मां.ची कथा आजच्या वातावरणात छान मेळवून घेतली आहे. काळाचं हे अंतर त्यामुळे मिटले आहे. मूळ कथेतील इसेन्स त्यांनी यात चौपट केला आहे. त्यातून परिस्थितीजन्य आणि शाब्दिक विनोदाच्या फुलझडी त्यांनी पेटवल्या आहेत. प्रशांत दामले यांच्यासारख्या विनोदावर हुकुमत असलेल्या कलाकारासाठी एवढं पुरेसं आहे. त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ उठवला आहे. सोबत कोल्हापुरी ठेच्याचा तडका दिलेला असल्याने त्याचं गुणोत्तर द्विगुणित होतं. कोल्हापुरी बोलीचा गावरान झटका मस्त जमलाय. त्याचबरोबर आमदार तानाजी खराडे हे इब्लिस पात्र आणि शामसारखा गावावरून ओवाळून टाकलेला टग्या यांचं मिश्रणही भारीच जमून गेलं आहे. पोराला एसएससीपार करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद आणि राजकारण्यांचा मुदलातच उतू जाणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर तानाजी खराडे नाटकभर धुमशान घालतो. त्याचंच बेणं असलेला शामही आपल्या अंगीच्या नाना कळांनी त्यात भर घालतो. अशी ही मास्तरांची शिकवणी ‘नाथाघरच्या उलट्या खूणे’प्रमाणे नाटकातील रंगत उत्तरोत्तर वाढवत नेते. खरं तर हे ‘प्रकरण’ प्रेक्षकांना पचायला अंमळ कठीण असलं तरी प्रारंभीच्या संभ्रमावस्थेनंतर ते लेखकाने रचलेल्या या खेळात सामील होतात. दिग्दर्शक या नात्याने अद्वैत दादरकरांनी ही लेखकीय करामत अधिक रंजक करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पण हे करताना विद्या, काका, काही अंशी हेलन ही पात्रं निव्वळ पानपूरक या पातळीवरच राहिल्याने नाटकातील गंमत काहीशी उणावते. तेच थोडंसं खराडेंच्या बाबतीतही घडतं. त्यांचा अति आक्रस्ताळेपणा जरा काबूत ठेवला गेला असता तर नाटकाचा हाय पीच थोडासा कमी झाला असता आणि नाटकाची रंगत आणखीन वाढली असती. अर्थात शामचा जेवढ्यास तेवढा वापर नाटकाचा तोल राखतो. या सगळ्यामुळे मग सारी भिस्त येऊन पडते ती प्रशांत दामले यांच्या खांद्यावर. ते आपल्या करामतींनी ती लीलया पेलतात, ही गोष्ट वेगळी.

प्रदीप मुळ्ये यांनी एका आदर्श मास्तराचं घर त्यातल्या तपशिलांनिशी उभं केलं आहे. घराची रंगसंगती, त्यातल्या वस्तू वगैरे. किशोर इंगळे यांनी प्रकाशयोजनेच्या खेळातून यातले घटना-प्रसंग ठळक केले आहेत. अशोक पत्की यांचं संगीत नाटकाचा मूड बनवणारं. गुरू ठाकूरच्या गीताचा परिणाम त्यांनी गडद केला आहे. श्वेता पेंडसे यांची वेशभूषा आणि प्रमोद खरटमल यांची रंगभूषा नाट्यपरिणामात भर घालणारी.

प्रशांत दामले खूप दिवसांनी आपल्या नेहमीच्या पिचबाहेर येऊन यात बॅटिंग करताना दिसताहेत. त्याचीही एक गंमत आहे. आदर्श शिक्षकाचं अध:पतन त्यांनी ज्या प्रकारे दाखवलं आहे… उदा. तंबाखू खाण्याचा प्रसंग, पबमधून आल्यानंतरची त्यांची अवस्था, डेटिंग अॅपबद्दलची त्यांची भलतीच उत्सुकता… यातून त्यांचं स्खलन दिसून येतं.

आपल्यावर लादलं गेलेलं आदर्शत्वाचं ओझं वागवताना आपल्यातील निखळ माणूस कसा पिचला गेला याबद्दलचं चिंतन करणारा भावुक क्षणही त्यांनी तितकाच खरा करून दाखवला आहे. शामच्या भूमिकेतील ऋषिकेश शेलार जेवढ्यास तेवढाच आगाऊपणा करतात. त्यातून निर्माण होणारे तिढे मात्र त्यांना बुचकळ्यात पाडतात. आपल्या मास्तरांचं अध:पतन एकीकडे एन्जॉय करतानाच जे होतंय ते काही बरोबर नाही याची कुरतडणारी जाणीवही त्यांना आहे. म्हणूनच मास्तरांना मान खाली घालावी लागू नये म्हणून शाम इमानेइतबारे अभ्यासही करतो. त्याचा वानवळा दाखवणारा प्रसंग पाहणाराला तोंडात बोटं घालायला लावल्याशिवाय राहत नाही. सुशील इनामदार यांचा आमदार खराडे थोडा आक्रस्ताळेपणाला आवर घातला असता तर राजकारण्यांचं अर्कचित्र उभं करणारा आहे. त्यांच्या सगळ्या करण्यासवरण्यातील घाई बोलण्यातदेखील उतरलेली जाणवते. समृद्धी मोहरीर यांची गावठी हेलन भाषेचा लहेजा पकडणारी, पण शब्दोच्चारांत निसरडी झाली आहे. काका (चिन्मय माहुरकर) आणि विद्या (अनघा मगरे) यांना फारसा वावच नाही.

एकुणात, ही आजच्या व्यंकूची शिकवणी प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार यांच्या मजबूत खांद्यांवर चांगलीच तरली आहे. .

Story img Loader