“एखादे मोठे नुकसान, तोटा किंवा बदल…”; पतीच्या सोशल मीडिया एक्झिटनंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. या प्रकरणानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर राज कुंद्राने त्याचे सर्व सोशल मीडियावरुन अकाऊंट डिलीट करत एक्झिट घेतली होती. यावर आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे. यात तिने ‘बदल’ आणि ‘मोठ्या नुकसानाबद्दल’ भाष्य केले आहे. त्यासोबतच तिची ही पोस्ट कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःला शोधण्याबद्दल असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे राज कुंद्राने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्यानंतर तिने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे अनेकांनी यावर कमेंट्स करण्यास सुरु केली आहे.

शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, “Wilderness of intuition.. तुम्ही तुमचे आरामदायी आयुष्य सोडून जंगलात जा. त्याठिकाणी तुम्हाला जे मिळेल ते फार आश्चर्यकारक असेल. तिथे तुम्ही स्वत:च स्वत:ला सापडाल. आपण नेहमी आरामाकडे झुकलेलो असतो. आपल्या आयुष्यात नेहमीच काही ना काही तक्रारी असतात. आयुष्यातील कोणत्याही गोष्टी परिपूर्ण नसतात. पण आपण कोण आहोत आणि आपण कुठे जात आहोत हे देखील बऱ्याच अंशी आपल्याला माहिती असते. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो तेव्हा काय होते? एखाद्या दुसर्‍या देशात एक वर्ष घालवल्यानंतर, आपला स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलतो.” असे तिने यात म्हटले आहे.

“एखादे मोठे नुकसान, तोटा किंवा मोठा बदल आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातो, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मला या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज आहे. यातून बाहेर पडल्यानंतर काय बदलते ते पाहावे लागेल. या बदलाशी लढण्याऐवजी मी त्याचा स्विकार करेन,” असे शिल्पा शेट्टीने तिच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिल्पा शेट्टीची ही पोस्ट पाहून तिचे चाहते गोंधळात पडले आहे. ती तिच्या या पोस्टमधून नक्की राज कुंद्राला समर्थन देत आहे की त्याला विरोध करतेय? याबद्दल काहीही खुलासा होत नाही. दरम्यान राज कुंद्रा जेलमधून सुटल्यानंतर शिल्पाने त्याच्यासोबत एकही फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला नाही. त्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीमध्ये काहीतरी बिघडलं असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान अद्याप तरी याबद्दल त्या दोघांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

दोन महिन्यांनी जामिनावर सुटका

दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै महिन्यात अटक केली होती. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २० सप्टेंबरला पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा मिळाला होता. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता. त्यासोबत राज कुंद्राचा साथीदार आणि या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार असलेल्या रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty instagram post after husband raj kundra deletes all his social media accounts nrp