छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी परिक्षक म्हणून दिसत आहे. शिल्पा गेल्या १४ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून लांब होती. तिने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. पण शिल्पाने इतका मोठा ब्रेक का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता एका मुलाखतीमध्ये शिल्पाने १४ वर्षे इंडस्ट्रीपासून लांब राहण्यामागचे कारण सांगितले आहे.

शिल्पा शेट्टीने ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीपासून १४ वर्षे लांब राहण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘मी स्वत:च्या मनाने हा ब्रेक घेतला होता. मी लग्नानंतर मुले झाले की ब्रेक घ्यायचा हे आधीच ठरवले होते. हा पण दुसरे मुल मला ९ वर्षांच्या अंतराने झाले ती वेगळी गोष्ट आहे. मी लग्नानंतर काम न करण्याचा निर्णय घेतला होता’ असे शिल्पा म्हणाली.

पाहा : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्राचा थाट; आलिशान घर पाहिलेत का?

पुढे शिल्पा म्हणाली, ‘१७ वर्षांची असल्यापासून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्यामुळे लग्नानंतर वेळेवर माझा हक्क असावा असे मला वाटत होते. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना दिवस भराचे शेड्यूल ठरलेले असते. त्यामुळे मला ब्रेक घ्यायचा होता. त्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चांगला चित्रपटांच्या ऑफर येत नव्हत्या. मला भूमिकांसाठी चांगले पैसे ऑफर केले जात होते पण त्याच रडक्या भूमिका होत्या. जे चित्रपट मी स्वत: पाहणार नाही अशा चित्रपटात काम करुन प्रेक्षकांकडून काय अपेक्षा ठेवू.’

भूमिका निवडताना शिल्पा काय विचार करत होती हे तिने पुढे सांगितले आहे. ‘असे नाही की मी इमोशनल चित्रपट करणार नाही पण जे काम करेन त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करेन असे मला नेहमी वाटायचे. पण अशा भूमिकांच्या ऑफर मला आल्या नाहीत. त्यानंतर निकम्मा आणि हंगामा २ची ऑफर आली’ असे शिल्पा म्हणाली.