शिवाजी मंदिर रंगकर्मीचं दैवत

मुंबईतील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहाने नुकतीच पन्नाशी पार केली. मराठी मनांचा मानबिंदू असलेल्या या वास्तूबद्दल एका सुहृदाने व्यक्त केलेलं हे मनोगत..

मुंबईतील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहाने नुकतीच पन्नाशी पार केली. मराठी मनांचा मानबिंदू असलेल्या या वास्तूबद्दल एका सुहृदाने व्यक्त केलेलं हे मनोगत..
पन्नास वर्षांनंतर एखाद्या गाण्याचं वा आविष्काराचं सादरीकरण पुन्हा जसंच्या तसं झालं तर किती रोमहर्षक वाटेल! तो क्षण मी नुकताच अनुभवला. निमित्त होतं दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहाच्या सुवर्णमहोत्सवाचं! शिवाजी मंदिरचा शुभारंभ झाला ३ मे १९६५ रोजी. त्या वेळी लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा कार्यक्रम उद्घाटनादिवशी झाला होता. सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी ३ मे २०१५ रोजी झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात पुन्हा लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना निमंत्रित करण्याची कल्पना मांडली आणि त्यांच्या एकाच लावणीने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे, न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा आगळावेगळा क्षण भारावणारा ठरला. मी गिरगावचा. सुलोचना चव्हाण याही गिरगावच्या. वयाच्या ८३व्या वर्षीही त्यांच्या गाण्यातला तोच रसरशीतपणा स्तिमित करणारा आहे, हेच खरं.
गिरगावातल्या साहित्य संघात मी नाटकं पाहत असे. रंगभूमीशी माझं नातं जुळलं ते इथूनच. गिरगावात त्या वेळी मराठी रसिकवर्ग खूप मोठा होता. गिरगावात साहित्य संघ आणि गिरणगावात दामोदर हॉल ही नाटय़गृहं मराठी नाटय़रसिकांचं मनोरंजन केंद्र होती. १९६५ साली दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ‘शिवाजी मंदिर’ हे अद्ययावत, वातानुकूलित पहिलं नाटय़गृह रसिकांसाठी खुलं झालं. पण तोपर्यंत माझा नाटय़व्यवसायाशी कसलाच संबंध आला नव्हता.
‘नाटय़ुसमन’ संस्थेचं व्यवस्थापन मी पाहायला लागल्यावर माझा नाटय़व्यवसायाशी थेट संबंध आला. इथूनच माझा ‘शिवाजी मंदिर’शी घनिष्ठ संबंध येत गेला आणि माझ्याही नकळत तो वृद्धिंगतही होत गेला.
‘शिवाजी मंदिर’सारख्या वास्तूत शिरताना एक गोष्ट माझ्या मनाला खटकायची. प्रवेशद्वाराला लागून जे सभागृह होतं तेथे कपडय़ांचे, भांडय़ांचे ‘सेल’ सतत सुरू असत. एकीकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, मराठी मनाचं प्रथम प्रेम असलेलं ‘नाटक’ ज्या शिवाजी मंदिरात सादर होतं, त्याच्या प्रवेशद्वारी रसिक प्रेक्षकांच्या स्वागतासाठी काय, तर साडय़ा आणि भांडी याचा मला भारी मानसिक त्रास व्हायचा. हे ‘सेल’ मला खूप खटकायचे. नाटय़व्यवसायात मी सक्रिय होईपर्यंत ‘शिवाजी मंदिर’ हे मुंबईचं एक सांस्कृतिक केंद्र झालं होतं. अशा ठिकाणी हे ‘सेल’ मला योग्य वाटेनात. मान्य आहे की, या दुकानामुळे संस्थेला आर्थिक उत्पन्न मिळतं. पण त्यासाठी दुसरा पर्याय नाही काय? त्यावर विचार करताना मलाच एक पर्याय सुचला. ‘शिवाजी मंदिर’सारख्या सांस्कृतिक केंद्राच्या ठिकाणी साहित्यिक पुस्तकविक्रीचं दुकान आलं तर? शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कीर्तीत त्याने भरच पडेल आणि या परिसराची शोभाही वाढेल असं मला वाटलं. नाटकाला येणाऱ्या आणि नाटकांच्या जाहिरातीचे बोर्ड पाहणाऱ्या रसिकांना पुस्तकांचं दुकान ही पर्वणी ठरेल. खऱ्या अर्थानं या सांस्कृतिक वास्तूत रसिकांसाठी ज्ञानाचं दालन सुरू होईल. ‘शिवाजी मंदिर’च्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस अण्णा सावंत आणि मनोहर नरे यांना मी माझी कल्पना सांगितली. म्हणालो, ‘‘अण्णासाहेब, नाटकाला येणाऱ्या रसिकांना कपडय़ांचे आणि भांडय़ांचे सेल पाहावे लागतात. हे काही योग्य दिसत नाही.’’
‘‘मग, काय करता येईल त्या जागेत?’’ असं दोघांनीही मला विचारलं.
‘पुस्तकाचं दुकान सुरू करा’ हा पर्याय मी त्यांच्यासमोर ठेवला. थोडा विचार करून अण्णांनी मला विचारलं, ‘‘कुणाला सांगता, पुस्तकाचं दुकान सुरू करायला?’’ मी म्हणालो, ‘‘मॅजेस्टिकच्या कोठावळय़ांना सांगतो.’’ ‘‘बोलवा बघू त्यांना. बघू या काय करता येतं ते.’’ अण्णांनी आश्वासक शब्दांत अनुमती दिली. मॅजेस्टिकच्या कोठावळय़ांचं छोटं दुकान गिरगावात आहे. तिथं मी माझी कल्पना अशोक कोठावळय़ांना सांगताच त्यांनी तात्काळ होकार दिला. आणि मग साडय़ा आणि भाडय़ांच्या कचाटय़ातून मराठी रसिक सुटला आणि ज्ञानाच्या दालनात आला. आज मॅजेस्टिकनं शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वात भर टाकली आहे. पुस्तकं घेण्यासाठी येणारा चाणाक्ष वाचक इथले नाटकांच्या जाहिरातींचे फलक वाचून कुठल्या नाटकाला जायचं, हेही निश्चित करतो.
अनेक नाटय़संस्थांचं व्यवस्थापन सांभाळताना ‘शिवाजी मंदिर’ला जाण्याचा माझा वेग वाढता राहिला आणि तिथल्या माझ्या वास्तव्यातही वाढ होत गेली. असंच एकदा ‘शिवाजी मंदिर’च्या कार्यालयात अण्णासाहेब त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होते. चर्चेत चिंतेचा विषय होता प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची काही तरी व्यवस्था करायला हवी, हा!
ते मी ऐकलं आणि मी माझ्याही नकळत म्हणालो, ‘अण्णा, केली मी व्यवस्था!’ इतका मी ‘शिवाजी मंदिर’शी एकरूप झालो होतो, की त्यांचा प्रश्न, त्यांची समस्या हीसुद्धा आता माझी वैयक्तिक झाली होती. जशी नाटय़व्यवसायात दुसऱ्याला मदत करणारी माणसं आहेत, तशीच नाटय़व्यवसायाबाहेरचीही आहेतच की.. मदतीला तत्पर असलेल्या अशाच व्यक्तींच्या अनुषंगाने अनेक समस्यांवर मात करता आली तसाच शिवाजी मंदिरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला.
  ‘शिवाजी मंदिरानं’ माझ्यासाठी व माझ्या कल्पना राबवण्यासाठी आजवर मला खूपच साहाय्य केलंय. मी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी अगदी नाटय़गृह ऐन वेळी उपलब्ध करून देण्यापासून ते नाटय़गृहाच्या भाडय़ात सूट देण्यापर्यंत! ‘शिवाजी मंदिर’मध्ये काही अडचणी आहेत. कारण त्याची वास्तुरचना ५० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे रंगमंच लहान आहे. तंत्रज्ञान बदलल्यानं रंगमंच अधिकच लहान वाटायला लागला. परंतु शिवाजी मंदिरच्या रंगभूषा कक्षात गप्पांमध्ये आणि मध्यंतरात गच्चीत किंवा नाटक संपल्यावर पार्किंगच्या जागेत उभे राहून गप्पा मारण्यात जी गंमत आहे ती गंमत आणि ते वातावरण औरच आहे. आपल्या छोटय़ाशा घरात दहा-दहा जण राहतात. अडचणी असतात, पण त्या अडचणी जशा आपल्याला जाणवत नाहीत, तसंच इथल्या आपुलकीनं ‘शिवाजी मंदिर’मधील अडचणी या आम्हा नाटकवाल्यांना अडचणी वाटत नाहीत. ‘शिवाजी मंदिर’मध्ये कोणताही बदल करावयाचा झाला की बॅकस्टेज कर्मचारी, बुकिंग क्लार्क यांची मतं विचारात घेतली जातात. ज्यांच्यासाठी हे बदल करायचे त्यांच्या मतांचा इथं आदर केला जातो. म्हणूनच ‘शिवाजी मंदिर’ आम्हाला आपलं वाटतं.
‘गोलपीठा’ या नाटकाच्या प्रयोगांना शिवाजी मंदिरात बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या या निर्णयाचा मला राग आला. मी लगेच जाहिरात केली. ‘अजब न्याय नाटय़ मंदिराचा!’ यामागचं माझं तर्कशास्त्र सरळ होतं. वेश्येला आपली दु:खं देवापुढे मांडण्यासाठी देवळात प्रवेश दिला जातो, मग त्याच वेश्यांची दु:खं अभिनयाद्वारे नाटकातून मांडण्यासाठी नाटय़ मंदिरात बंदी का? माझ्या जाहिरातीने मंडळाचे पदाधिकारी चिडले, तेव्हा मी काही साहित्यिकांना सपत्नीक ‘गोलपीठा’ नाटकाचा प्रयोग पाहायला बोलावले आणि त्यांच्या प्रतिक्रिया ‘गोलपीठा’च्या जाहिरातींमधून वापरायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला आणि शिवाजी मंदिरच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गोलपीठा’वरची बंदी मोठय़ा मनाने उठवली आणि त्याचे प्रयोग ‘शिवाजी मंदिरात’ सुरू झाले. याचा कसलाही राग मनात न ठेवता उलट माझ्या कार्यक्रमांसाठी मंडळाने मला नेहमीच मदत केली आहे. म्हणूनच ‘शिवाजी मंदिर’ हे मला माझं वाटतं. ‘शिवाजी’ हे जसं मराठी माणसांचं दैवत आहे, तसंच शिवाजी मंदिर हे साऱ्या मराठी रंगकर्मीचं दैवत आहे.
मी नाटकवाला आहे. थोडा तिरकसही आहे. नाटय़गृहामधील त्रुटी मला चटकन् दिसतात आणि मी त्या स्पष्टपणे सांगतो. पण मंडळाचे पदाधिकारी त्या मोकळेपणाने मान्य करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. मग मी अधिक उत्साहाने नव्या त्रुटी शोधतो. विशेष असा, की माझ्या या टीकेबद्दल किंवा सूचनेबद्दल ‘शिवाजी मंदिर’च्या पदाधिकाऱ्यांनी ना कधी कडवटपणा दाखवला, ना कधी तो मला दिसला.
अशा या ‘शिवाजी मंदिर’ने नुकतीच पन्नास र्वष पूर्ण केली आहेत. या सुवर्णमहोत्सवासाठी संस्थेस प्रायोजक नक्कीच मिळाला असता. आजच्या व्यावहारिक जगात अशा महोत्सवी सोहळय़ांसाठी प्रायोजक हा अविभाज्य भाग झाला आहे. पण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले, की हा ‘सुवर्ण महोत्सव’ प्रायोजकांविना करायचा. याचं कौतुक करायला हवं. त्याबद्दल सारे पदाधिकारी व कर्मचारी यांचं मनापासून अभिनंदन!
-अशोक मुळ्ये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivaji mandir natyagruha